अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच क्रीडाक्षेत्रातही आगेकूच करावी, असे प्रतिपादन अकोला जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय मालोकार यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सीबीएसई मान्यताप्राप्त शाळांच्या आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते विचार मांडत होते. समर्थ शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, ज्येष्ठ क्रीडापटू शरद कोकाटे, पूरण गंगतिरे यांची मंचावर उपस्थिती होती.
२३ व २४ जानेवारी अशा दोन दिवसांत झालेल्या या स्पर्धेत अकोल्यातील प्रभात किड्स, नोएल स्कूल, आरडीजी पब्लिक स्कूल, श्री समर्थ पब्लिक स्कूल, पोद्दार स्कूल, जुबिली कुंभारी, एस.ओ.एस हिंगणा इत्यादी शाळांचे चमू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. उद्घाटनसत्रात श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती स्तवन व शालेयगीत गाऊन वातावरण निर्मिती केली.
१४ व १७ वयोगटातील मुलामुलींसाठी झालेल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. १४ वर्षे वयोगटातील मुलींमधून पहिला क्रमांक प्रभात किड्स, दुसरा क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूल, तर तिसरा क्रमांक पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चमूने पटकावला. १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात पहिला क्रमांक आरडीजी पब्लिक स्कूलने, दुसरा क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूलने, तर तिसरा क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या चमूने पटकावला. २४ जानेवारीला १७ वर्ष वयोगटातील मुलींसाठी झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूल, दुसरा क्रमांक आरडीजी पब्लिक स्कूल, तर तिसरा क्रमांक ज्युबिली जुबिली स्कूल कुंभारीच्या चमूने पटकावला.
१७ वर्ष वयोगटाती मुलांसाठी झालेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक प्रभात किड्स, दुसरा क्रमांक आरडीजी पब्लिक स्कूल, तिसरा क्रमांक श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या चमूने पटकावला. विजेत्या चमूतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व करंडक देऊन गौरवण्यात आले. शाळेच्या चमूसोबत आलेल्या प्रशिक्षकांनाही सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून स्वप्निल बनसोड, आशिष बेलोकार, कैलास बोराडे, मोहित तायडे, अक्षय कळमकर, अंकुश यांनी कामकाज बघितले.
या दोन दिवसीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेला श्री समर्थ शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष राजेश बाठे, कोषाध्यक्ष प्रा. जयश्री बाठे, सहसचिव प्रा. किशोर कोरपे, सदस्य प्रा.योगेश जोशी, संचालक प्रा. किशोर रत्नपारखी, मुख्याध्यापक सुमित पांडे, उपमुख्याध्यापिका अश्विनी थानवी यांच्यासह निमंत्रितांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रेमेन्द्र पळसपगार यांनी केले त्याच प्रकारे शाळेचे शारीरिक शिक्षक मयूर निंबाळकर व आरती सोनवणे यांचे विशेष योगदान लाभले.