अकोल्यात ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ ! NSUI चा स्तुत्य उपक्रम

    0
    7

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : संविधानाचे संरक्षण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाहीच्या सद्यस्थितीवर देशभर चर्चा होत असताना, संविधानाची निर्मिती, त्यामागील विचार आणि त्यातून प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालेले अधिकार यांची जाणीव समाजातील सर्व घटकांना होणे आवश्यक आहे. महिला, शोषित-वंचित, कष्टकरी, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्याय व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी संविधानात करण्यात आलेल्या तरतुदी आणि त्यांचा मूळ गाभा असलेल्या उद्देशिकेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने NSUI च्या माध्यमातून अकोल्यात ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र NSUI च्या महासचिव प्रांजली देशमुख यांनी केली.

    राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या ‘माझे शिक्षण, माझे पर्यावरण, माझी लोकशाही वाचवा’ अभियानांतर्गत क्लबचा पहिला उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीचा इतिहास, उद्देशिकेतील मूल्ये, त्यांचे महत्त्व आणि भारतीय लोकशाहीतील योगदान समजावून सांगण्यात येणार आहे. या उपक्रमात अकोल्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रांजली देशमुख यांनी केले. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी NSUI च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
    दरम्यान, २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त NSUI अकोलाच्या वतीने अशोक वाटिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करणारी पत्रके नागरिकांना वितरित करून त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे आयोजन NSUI अकोला शहर जिल्हाध्यक्ष प्रथमेश इंगळे यांनी केले होते. यावेळी अजय गायकवाड, प्रांजली देशमुख, शेख दानिश, शेख मुसैब, नवाज खान, ओम टाकोरे, प्रशिक गुडदे यांच्यासह NSUI चे पदाधिकारी, सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!