अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बिर्ला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रदीपसिंह राजपूत सर, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा राजपूत मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी हर्ष इंगोले या विद्यार्थ्याने भारतीय राज्यघटनेचे महत्त्व आणि तिच्यातील मूलभूत मूल्यांची माहिती दिली.

संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या बालमंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, स्वच्छता, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेमध्ये विविध खात्यांची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची क्षमता, गुणवत्ता आणि शालेय प्रगती लक्षात घेऊन त्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.
प्राचार्या मनीषा राजपूत यांनी सर्व मंत्रिमंडळ सदस्यांना शपथ दिली. तसेच प्रत्येक पदाची जबाबदारी आणि कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय बालमंत्रिमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळते. हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्राथमिक शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्याला मिळालेले प्रत्येक पद हे केवळ प्रतिष्ठेचे नसून ती एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या जबाबदारीचे यशस्वीपणे निर्वहन करण्यासाठी संयम, शिस्त आणि सहकार्याची भावना आवश्यक असते शाळेच्या कामकाजासाठी जैसे काही नियम व कायदे असतात, त्याचप्रमाणे देशाच्या सुव्यवस्थित कारभारासाठी राज्यघटना मार्गदर्शक ठरते. भारतीय संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही अमूल्य मूल्ये दिली आहेत. ही मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्यास समाज अधिक सुखी, समृद्ध आणि शांततापूर्ण होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने संविधानाचा आदर करून देशाप्रती असलेली आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले.
बालमंत्रिमंडळातील नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे : शाळा नायक : हर्ष इंगोले, निधी जाधव. उपनायक : ईशांत राऊत, अनुष्का जुनारे
- शिस्त मंत्री : यश मोरे, मृणाली लोखंडे
- स्वच्छता मंत्री : श्रेयस भटकर, आराध्या सागर
- सांस्कृतिक मंत्री : गायत्री चारोडे, धनश्री नेमाडे
- क्रीडा मंत्री : वेदश्री मानकर, संकेत पवार
- इंग्रजी संभाषण मंत्री : समृद्धी डांगे, अंजली चऱ्हाटे
- विद्यार्थी संसाधन मंत्री : वेदांत नावकार, प्राविण्या शेगोकार
- आरोग्य मंत्री : दर्शना बेलसरे, जीविका तायडे
- कार्यक्रमादरम्यान २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दुर्गा राऊत, गाढे सर, सुषमा देशमुख, भाले मॅडम, बोरकर मॅडम व खर्चे मॅडम यांनी परिश्रम घेतले. शेवटी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.