अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) परिसरात मानवी शरीराचे वेगवेगळे अवयव आढळून आल्याने आज गुरुवारी सकाळीच मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या विविध ठिकाणी दोन हात, एक पाय आणि डोके आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे, या मानवी अवयवांचे कुत्रे लचके तोडत असल्याचेही निदर्शनास आले. कुत्र्यांनी एक पाय वॉर्ड क्रमांक ९ समोर आणून टाकल्याने हा प्रकार रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ समोर कुत्र्यांनी मानवी शरीराचा एक पाय आणून टाकला. यावेळी कुत्रे त्या अवयवाचे लचके तोडत असल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता परिसरात मानवी शरीराचे आणखी अवयव आढळून आले. वॉर्ड क्रमांक ५१ आणि १० यांच्या मधोमध असलेल्या नालीमध्ये शरीरापासून वेगळे झालेले एक हात आणि डोके आढळले. तसेच रुग्णालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस आणखी एक हात मिळून आला. अशा प्रकारे एकाच परिसरात दोन हात, एक पाय आणि डोके आढळल्याने रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

विशेष म्हणजे, आढळलेले अवयव नेमके कोणाचे आहेत, ते स्त्रीचे आहेत की पुरुषाचे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. तसेच हे अवयव रुग्णालय परिसरात कसे आले, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी मानवी अवयव आढळून आल्याने या प्रकाराचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.