अकोलेकरांना ११ दिवसांनी पाणी अन् जलतरणासाठी टँकरने पाणी ?

    0
    2

    निलेश देव यांची पोलीस,कलेक्टर व आयुक्तांकडे तक्रार अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना तब्बल ११ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांतील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत अकोला महानगरपालिकेच्या नवीन जलतरण तलावात उद्घाटनाच्या निमित्ताने टँकरद्वारे पाणी भरले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेता तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी केली आहे.

    यासंदर्भात त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी अकोला आणि अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे संयुक्त तक्रार दाखल करून कायदेशीर व प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे. शहरात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक भवन, जलतरण तलावाची सुविधा निर्माण होत आहे. या विकासकामांचे स्वागत करतो. मात्र, शहरात पाणीटंचाई असताना नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन आणि दुसरीकडे जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरणे, हा प्रशासनाने स्पष्ट करण्याचा विषय असल्याचे देव यांनी म्हटले आहे.

    जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नवीन बोअरवेल खोदण्यावर निर्बंध आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मग जलतरण तलावासाठी पाणी कोणत्या स्रोतामधून आणले? किती टँकर वापरण्यात आले? पाणी भरण्याची परवानगी कोणी दिली? याची सविस्तर माहिती प्रशासनाने जनतेसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    देव यांनी आपल्या तक्रारीत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील लागू तरतुदींच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच जलतरण तलावासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा स्रोत, टँकरची संख्या, खर्च आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    पाणीटंचाई कायम असेपर्यंत जलतरण तलावात अतिरिक्त पाणी भरणे आणि नियमित वापर सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!