अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : देशातील वाढते वायुप्रदूषण, प्रदूषित नद्या आणि विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड चिंताजनक आहे. छत्तीसगडमधील हसदेव अरण्य, महाराष्ट्रातील अलिबागचे कांदळवन आणि अमरावतीतील वनक्षेत्र यांसारख्या प्रकरणांतून पर्यावरण संरक्षण आणि विकास प्रकल्पांबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.विकासाचा फायदा कोणाला आणि त्याची किंमत कोण मोजत आहे.हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला असून शिक्षण व्यवस्था, पर्यावरणाचा ऱ्हास आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या या प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी NSUI महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ‘माझे शिक्षण, माझे पर्यावरण आणि माझी लोकशाही’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात हे अभियान संपूर्ण ताकदीनिशी राबविले जाणार आहे. अशी माहिती अकोला जिल्हा NSUI कडून एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

शिक्षण क्षेत्रात पेपरफुटी, परीक्षांमधील गोंधळ, सरकारी शाळांची दुरवस्था, शाळा बंद होणे आणि आश्रमशाळांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत आहे. सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याऐवजी ती कमकुवत का होत आहे, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
तसेच मतदार याद्यांमधील त्रुटी, SIR प्रक्रियेबाबतच्या शंका आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहणे आणि निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कायम राहणे आवश्यक आहे.
पर्यावरणाचा विनाश, शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था आणि लोकशाही अधिकारांवरील प्रश्न हे केवळ स्वतंत्र विषय नसून देशाच्या भविष्याशी निगडित गंभीर प्रश्न आहेत. या तिन्ही आघाड्यांवर सरकारने उत्तरदायित्व स्वीकारून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी NSUI महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेशने घोषित केलेले हे अभियान अकोला जिल्ह्यातही व्यापक स्वरूपात आणि मोठ्या ताकदीने राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. तसेच या प्रश्नांवर विद्यार्थी आणि युवकांना संघटित करून लोकशाही मार्गाने सरकारला जाब विचारला जाईल.
या पत्रकार परिषदेला NSUI प्रदेश महासचिव प्रांजली देशमुख व गौरी सरोदे, प्रदेश सचिव मंथन शिरसाट, अकोला शहर जिल्हाध्यक्ष प्रथमेश इंगळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रसाद धुमाळे यांच्यासह सार्थक गोळे, अथर्व सरोदे, शेख दानिश आणि नवाज खान उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट केली.