अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला प्रतिष्ठेच्या ‘एज्यु.एक्सलन्स अँड इनोव्हेशन अवॉर्ड-2026’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकोला येथे युवा सक्षम फाउंडेशनच्या वतीने आयोजित एज्यू. एक्स्पो 2026 अंतर्गत दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शाळेने शिक्षण क्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पनाधारित शिक्षणपद्धती, कृतीआधारित शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली होती.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला तज्ञ प्रशिक्षक डॉ. प्रदीप सोमानी, प्रभात किड्सचे संचालक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारे, आर डि जी शिक्षण संस्थेचे संचालक दिलीपराज गोयनका, ललित कोचिंग क्लास चे संचालक ललित काळपांडे, समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन बाठे, तज्ञ् विज्ञान संशोधक नितीन ओक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, नीतू ढोणे आदी शिक्षक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने किड्स पॅराडाईज स्कूलने सातत्याने नवनवीन शैक्षणिक प्रयोग राबविले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञानाची आवड, क्रीडागुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शाळेने विशेष पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या अभिनव वाटचालीला मिळालेली ही पावती म्हणजे संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरवच आहे.
या पुरस्कारामुळे पातूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थाही गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण कार्याच्या जोरावर व्यापक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे किड्स पॅराडाईज स्कूलने सिद्ध केले आहे.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक, व्यवस्थापन, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.