वेध भविष्याचा !अकोल्यातील ‘पाणी टंचाई’ वर मात करण्यासाठी 132 कोटींचा निधी मंजूर : आ. सावरकर

    0
    3

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शहरावर आलेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या सावटाला दूर करण्यासाठी, भविष्याचा वेध घेऊन, राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी अकोला महापालिकेला १३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या अडीच महिन्यात शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अशी माहिती विधानसभा मुख्य प्रतोद तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात काल गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत उपलब्ध जलसाठा, सध्याची पाणीपुरवठा स्थिती आणि आगामी नियोजनाची माहिती आ. सावरकर यांनी दिली. वार्ताहर बैठकीत खासदार अनुप धोत्रे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल,भाजप महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक जयंतराव मसने, उपमहापौर अमोल घोगे, गटनेते पवन महल्ले, नगरसेवक सुनील मेश्राम, रणजीत खेडकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

    अकोलेकरांना नियमित, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असून शहराच्या पाणीप्रश्नावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अकोलेकरांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागणार नाही.तसेच टॅकरवर अवलंबून असलेल्या शहरातील काही भागांना टॅकरने पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने नियोजन केले जाते आहे. अशी माहिती सावरकर यांनी दिली.

    •पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे आणि उपाययोजना✓✓✓

    • मोर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा. अकोला शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी मोर्णा प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. यामध्ये मोर्णा प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ७०० मिमी व ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांची कामे, पंपिंग व्यवस्था, ब्रेक प्रेशर टँकची उभारणी तसेच पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढविणे यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर काम केले जाणार आहे.
    • पर्यायी जलस्रोतांचे बळकटीकरण. काटेपूर्णा आणि महान धरणांमधील घटता जलसाठा पाहता ६४ खेडी पाणीपुरवठा योजना, खांबोरा पाणीपुरवठा योजना आणि घुसर ते चौहट्टा बाजार या योजनांसाठी पर्यायी व्यवस्था उभारली जात आहे
    • विविध हायड्रंटमधून पाणीपुरवठा : अकोला शहरातील विविध ठिकाणच्या हायड्रंटमधून ५,००० लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जाईल. दररोज ५ दशलक्ष लिटर (५ MLD) पाण्याची एकूण मागणी गृहीत धरल्यास, १८० दिवसांसाठी दररोज एकूण २०० टँकर चालवले जातील, ज्यात प्रत्येक टँकरच्या पाच फेऱ्या होतील. याचा अंदाजित खर्च ७.७१ कोटी रुपये आहे.
    • माजिप्राच्या अकोट केंद्रापासून वाहतूक
    • एमजेपीआरएच्या अकोट जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला येथे ४ एमएलडी (दररोज ४०,००० लिटर) पाणी वाहून नेण्यासाठी २५,००० लिटर क्षमतेचे टँकर वापरले जातील. यासाठी एकूण ४० टँकर (प्रत्येक टँकरच्या ४ फेऱ्या: ४० × २५,००० × ४ = दररोज ४ एमएलडी) चालवले जातील. याचा अंदाजित खर्च ₹३६.७३ कोटी आहे.
    • बाष्पीभवन रोखणे व अधिग्रहण. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. याशिवाय गरज भासल्यास खासगी विहिरी व इतर जलस्रोत अधिग्रहित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याशी समन्वय साधून निधी उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा सुरू आहे.असे आ.सावरकर यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!