अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : किल्ले म्हटले की आजही प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची आठवण होते. या किल्ल्यांची उत्सुकता व महत्व आजही कायमच आहे. त्यामुळे प्रत्येक दिवाळीत अनेक लहान बालक आपल्या घराच्या अंगणात मातीचे सुबक किल्ले तयार करतात. नवीन पिढीस किल्ल्यांची माहिती व्हावी या हेतूने घरातील हौशी वडीलधारी मंडळी आपल्या लहान मुलांकडून किल्ले बांधून घेतात व हे किल्ले बांधण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व मदतही करतात. परंतु आता हळूहळू हे किल्ले बांधण्याची परंपरा संपुष्टात येत आहे. तरीही काही जागरूक पालक आपल्या घराच्याअंगणात माती व इतरही टाकाऊ वस्तूंपासून किल्ले बनविण्यासाठी आपल्या मुलांना मदत करतात. असाच एक छोटासा किल्ला नर्सरीत शिकणाऱ्या खेडकर नगरातील अधिराज अक्षय खाडे या बालकाने तयार केला आहे.

भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात किल्ल्यांचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. किल्ल्यांचा काळ आणि त्यांचा विकास पुढील प्रमाणे सांगता येईल. सिंधू संस्कृती ते यादव काळ हा प्राचीन काळ समजला जातो. सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहंजोदडो सारख्या प्राचीन नगरांभोवती संरक्षणासाठी मोठ्या विटा आणि दगडांच्या तटबंदीचे पुरावे सापडतात. वैदिक व प्राचीन युगात ऋग्वेदात किल्ला किंवा संरक्षणासाठी बांधलेल्या वाड्यास ‘पूर’ म्हणण्याचा उल्लेख आढळतो. मनुस्मृति कौटील्यांचे अर्थशास्त्र आणि महाभारतात किल्ल्यांचे विविध प्रकार सांगितले जातात. त्यात जलदुर्ग, गिरीदुर्ग, वनदुर्ग यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात यादव, शिलाहार आणि सातवाहन राजवटीच्या काळात अनेक डोंगराळ किल्ले लष्करी आणि व्यापारी मार्गाच्या रक्षणासाठी बांधले गेले. त्यात गिरीदुर्ग, शिवनेरी, लोहगड आणि इतरही डोंगराळ किल्ल्यांचा समावेश आहे.
बहामनी, निजामशाही आणि आदिलशाही यांच्या मध्ययुगीन काळात 13 व्या शतकानंतर दक्षिण भारतात बहामनी सल्तनत आणि पुढे तिचे विभाजन होऊन निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अस्तित्वात आल्यात. त्यांच्या काळात किल्ल्यांची रचना अधिक मजबूत करण्यात आली, त्यांच्या किल्ल्यांवर भक्कम दरवाजे, बुरुज आणि तोफांच्या माऱ्याचा सामना करू शकतील अशा उतरत्या आणि जाड भिंती बांधल्या गेल्या.
मराठा साम्राज्य, त्यातही शिवाजी महाराजांचा काळ किल्ल्यांच्या बाबतीत सुवर्णकाळ मानल्या जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत किल्ल्यांचे महत्त्व ओळखले होते. ‘गड आला पण सिंह गेला’ हे काळीज हेलावणारे वाक्य किंवा शिवरायांची संपूर्ण रणनीती किल्ल्यांवरच आधारित होती. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा नैसर्गिक फायदा घेऊन महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि नवीन बांधले. त्यात प्रामुख्याने राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा या किल्ल्यांचा समावेश आहे. त्या काळात किल्ले हे केवळ संरक्षणाचे केंद्र नव्हते तर ते स्वराज्याचे प्रशासन, शस्त्रागार आणि राजधानीचे मुख्य केंद्र होते. त्यामुळेच रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली होती. आजही स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच साजरा केला जातो.
18 व्या शतकाच्या शेवटी आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी मराठ्यां विरोधातअनेक युद्ध करून हळूहळू ते किल्ले आपल्या ताब्यात घेतले. 1818 मध्ये पुरंदर आणि इतर किल्ले ब्रिटिशांच्या हातात गेले. त्यानंतर तोफा आणि आधुनिक युद्धांच्या तंत्रज्ञानामुळे जुन्या पारंपारिक किल्ल्यांचे लष्करी महत्त्व हळूहळू कमी झाले. आणि आज ते पूर्णपणे संपले आहे.
अशा या किल्ल्यांचा इतिहास ताजा राहावा आणि त्याचे महत्त्व नवीन पिढीस समजावे या उद्देशाने बालक वर्ग बांधत असलेल्या किल्ल्यांना महत्त्व आहे. आणि थोरामोठ्यांनी असे किल्ले बांधणाऱ्या बालकांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळून भविष्यात ते अधिक सुंदर किल्ल्यांची निर्मिती करू शकतील.
