अकोल्याचा ओबेराय यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘OSD’ बनून घातला ३ कोटींचा महागंडा ! भामटा गजाआड

    0
    7

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय गोटात प्रचंड खळबळ उडवून देणारी एक सणसणीत घटना मुंबईत काल मंगळवारी उघडकीस आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत जवळचा आणि विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून अकोल्यातील एका प्रतिष्ठित शासकीय कंत्राटदाराला तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आसिफ इस्माईल पठाण (रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या हायप्रोफाईल भामट्याचे नाव आहे.

    नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण ? : अकोला येथील नामांकित शासकीय कंत्राटदार आणि ‘ओबेराय कन्स्ट्रक्शन कंपनी’चे संचालक रणजीत सिंग ओबेरॉय यांची सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सुमारे ५० कोटी रुपयांची देयके (Bills) प्रलंबित होती. याचाच गैरफायदा आरोपी आसिफ पठाणने घेतला. त्याने ओबेरॉय यांच्याशी संपर्क साधून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी (OSD) असून मंत्रालयात आपली मोठी वजनदार उठबस असल्याचे सांगितले. “तुमची ५० कोटींची प्रलंबित बिलं मी एका झटक्यात मंजूर करून देतो,” असे आमिष दाखवून त्याने ओबेरॉय यांचा विश्वास संपादन केला. हे काम मार्गी लावण्यास कमिशनच्या नावाखाली ओबेरॉय यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये उकळले.

    …आणि भामट्याची हाव नडली ! सरळ मुख्यमंत्र्यांचा ओएसडी असल्याने काम होणारच या विश्वासाने ओबेरॉय यांनी कोट्यवधी रुपये मोजले. मात्र, एवढी मोठी रक्कम पचवूनही आरोपी आसिफ पठाणची हाव संपली नाही. त्याने काम पूर्ण करण्यासाठी ओबेरॉय यांच्याकडे पुन्हा ७५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने आणि काम रखडल्याने कंत्राटदार रणजीत सिंग ओबेरॉय यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रणजीत सिंग ओबेरॉय थेट मुंबईच्या मंत्रालयात पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात (CMO) जाऊन ‘आसिफ इस्माईल पठाण’ नावाच्या अधिकाऱ्याबाबत चौकशी केली. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात किंवा मंत्रालयात अशा नावाचा कोणताही अधिकारी अस्तित्वातच नाही, हे समजताच ओबेरॉय यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्याला करोडोंचा गंडा घातला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट मरीन लाईन्स पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

    पोलिसांचा मोठा संशय: आणखी किती कंत्राटदार जाळ्यात?ओबेरॉय यांच्या तक्रारीवरून मरीन लाईन्स पोलिसांनी तत्परतेने चक्रे फिरवून आरोपी आसिफ इस्माईल पठाण याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे मंत्रालयाच्या नावाखाली तोतयागिरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
    दरम्यान, आरोपी आसिफ पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याची बोलण्याची पध्दत पाहता, त्याने मंत्रालयाचे बनावट ओळखपत्र किंवा नावाचा वापर करून राज्यातील इतरही अनेक कंत्राटदारांची अशीच फसवणूक केली असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मरीन लाईन्स पोलीस आता या रॅकेटमध्ये त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का आणि त्याने आतापर्यंत कोणाकोणाला लुटले आहे, याचा कसून तपास करत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!