अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : मल्टीस्टेट दर्जा प्राप्त बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीतील खात्यांमध्ये अफरातफर करुन तब्बल ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी पुणे येथील कॉलेज रोड भागातील रहिवासी आणि बुलढाणा अर्बन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८) व विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे (वय ४४) व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेमुळे संपूर्ण सहकारी बॅकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.हा प्रकार १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला.याबाबत बुलडाणा येथील रहिवासी आणि लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल (वय ५१) यांनी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष देशपांडे हे बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये पश्चिम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि योगिनी पोकळे विभाग व्यवस्थापिका होत्या. लेखापरीक्षण अहवालात त्यांनी सोसायटीमध्ये अफरातफर केल्याचे समोर आल्याने दोघांनाही सोसायटीने डिसेंबर २०२५ मध्ये काढून टाकले होते. त्यानंतर सोसायटीच्या खात्यांचा फॉरेसिक ऑडिट केल्यानंतर आता सोसायटीच्या वतीने लेखापाल मोहन दलाल यांनी फिर्याद दिली आहे.
संस्थेच्या विश्वासाचा गैरफायदा व पदाचा गैरवापर करुन देशपांडे व योगिनी पोकळे यांनी बुलढाणा सोसायटीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. नियमबाह्य कर्ज प्रकरणे मंजूर करणे,स्वत:च्या फायद्यासाठी ० टक्के दराने कर्ज घेणे. बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फायद्यासाठी बिनव्याजी अॅडव्हान्स देणे, ही कंपनी बँकेची सबसिडीयरी कंपनी दाखवणे व या कंपनीकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची खोटी सही करुन सदस्यत्व देणे, व नंतर रद्द करणे, खोटे बॅलन्सशिट आर.ओ.सीचे साईटवर अपलोड करणे असे अनेक गैरप्रकार केले.
त्याचबरोबर सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता सोसायटीसाठी मालमत्ता खरेदी करणे, तारण न घेता कर्ज देणे, संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय व्याजाची रक्कम माफ करणे, तारण मालमत्ता विक्री करुन या रक्कमा सोसायटीमध्ये न भरणे, परवानगीशिवाय मेटेनन्सचा खर्च करणे, कर्जदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम भरुन त्या इतर बँक खात्यात बेकायदेशीरपणे वळवणे, इतर खात्यांमध्ये अफरातफर करणे, अशा प्रकारे गैरव्यवहार करुन त्यांनी संस्थेची वैधानिक लेखा परिक्षक यांच्या अहवालाप्रमाणे ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.

सोसायटीच्या वतीने तक्रार देण्यात आली होती. तक्रारीच्या चौकशीनंतर शिरीष देशपांडे, योगिनी पोकळे आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३१६ (२), ३१८, ३३८, ३ (५) आणि ३४० अंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील तपास करीत आहेत.
