Homeजिल्हाधिकारी मीना यांच आवाहन ! राज्य महोत्सवात अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग...

जिल्हाधिकारी मीना यांच आवाहन ! राज्य महोत्सवात अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा

ऑनलाईन अर्जासाठी ganeshostav.pldmka.co.in पोर्टल

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शासनाने राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ आता तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णयानुसार या भव्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे विहित वेळेत दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करावयाचा आहे. स्पर्धेसाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे आहेत या स्पर्धेत केवळ संबंधित यंत्रणेद्वारे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक गणेशोत्सव मंडळेच सहभागी होऊ शकतात. नवीन मंडळांना संधी देण्याच्या उद्देशाने, चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिके प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यावर्षीच्या पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. (सदरची अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव मंडळांनाही लागू राहील). या स्पर्धेसाठी मंडळांनी केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

विविध स्तरांवरील विजेत्या मंडळांना खालीलप्रमाणे भरघोस रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुका स्तर: प्रथम क्रमांक – २५ हजार रुपये, जिल्हा स्तर: प्रथम क्रमांक -५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक -४० हजार रुपये, तृतीय क्रमांक – ३० हजार रुपये, राज्य स्तर: प्रथम क्रमांक – ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक – ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक- २ लाख ५० हजार रुपये राष्ट्रीय स्तर: प्रथम क्रमांक – ७ लाख ५० हजार रुपये द्वितीय क्रमांक- ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक-२ लाख ५० हजार रुपये आंतरराष्ट्रीय स्तर: प्रथम क्रमांक- ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ५ लाख रुपये, तृतीय क्रमांक- २ लाख ५० हजार रुपये याव्यतिरिक्त, राज्यस्तरीय निवड समितीकडे आलेल्या ३६ जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांपैकी, राज्यस्तरावरील पहिले ३ विजेते वगळून उर्वरित ३३ मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.

उत्कृष्ट मंडळांची निवड करताना कलांचे जतन व संवर्धन, संस्कृतीचे जतन, निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे संवर्धन, सामाजिक कार्य आणि गणेशोत्सव आयोजनातील विधायकता (उदा. पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, महिलांचा ३० टक्के सहभाग इत्यादी) या १०० गुणांच्या निकषांवर परीक्षण केले जाईल.

स्पर्धेचे सविस्तर निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाच्या प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत संकेतस्थळाला ganeshostav.pldmka.co.in आवर्जून भेट द्यावी. अधिक माहितीसाठी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. तरी समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या अमरावती विभागातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (अकोला जिल्हा माहिती कार्यालय द्वारे)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular