अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : एका छोट्या गावातील मुलाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न जिल्हा राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो. यामुळे विद्यार्थ्याला एक विलक्षण अनुभव मिळतो- “माझ्या गावातील प्रश्नालाही राष्ट्रीय महत्त्व असू शकते!” ही भावना ग्रामीण आणि निमशहरी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करण्याची संधी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत प्रकल्प सादर करणे ही स्वतःमध्ये अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्याला विविध स्तरांवर आपले काम मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याच्या कामाची दखल शिक्षक, तज्ज्ञ, वैज्ञानिक, संशोधक आणि इतर विद्यार्थी घेतात. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे-खरे यश म्हणजे फक्त पुरस्कार मिळवणे नव्हे; वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला शिकणे हे त्याहून मोठे यश आहे.

प्रसिद्ध वैज्ञानिकांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी विज्ञानाच्या क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणे हा विद्यार्थ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असतो. एखाद्या वैज्ञानिकाला जवळून पाहिल्यावर मुलाच्या मनात विचार येतो- “मीही मोठा झाल्यावर असे संशोधन करू शकतो का?” याच एका विचारातून कारकीर्दीचे स्वप्न जन्म घेऊ शकते. कधी कधी एका वैज्ञानिकाची भेट, एक प्रेरणादायी वाक्य किंवा एका प्रकल्पाचे कौतुक विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते. भविष्यातील शिक्षणासाठी मजबूत पाया. आजच्या जगात फक्त पाठांतर पुरेसे नाही. भविष्यात विद्यार्थ्यांना Critical Thinking, Creativity, Communication, Collaboration आणि Problem Solving यांसारख्या कौशल्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत या सर्व कौशल्यांचा नैसर्गिक पद्धतीने विकास होतो. म्हणून NCSCचा अनुभव पुढील उच्च शिक्षणासाठीही अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वैज्ञानिक करिअरची दारे उघडू शकतात एखाद्या विद्यार्थ्याला NCSCच्या प्रकल्पातून प्रथमच जाणवते.

मला विज्ञान आवडते !यानंतर त्याला संशोधन, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र,पर्यावरणशास्त्र, कृषीशास्त्र, खगोलशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ऊर्जा किंवा इतर वैज्ञानिक क्षेत्रांकडे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. म्हणून NCSC ही केवळ एका वर्षाची स्पर्धा नसून वैज्ञानिक करिअरची पहिली पायरी ठरू शकते.
समाजासाठी काहीतरी करण्याची भावना : राष्ट्रीय बालविज्ञान परिषद विद्यार्थ्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते-“तुझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल?” म्हणून प्रकल्प केवळ सुंदर मॉडेल बनवण्यापुरता मर्यादित राहत नाही. विद्यार्थी विचार करू लागतो – माझ्या गावासाठी मी काय करू शकतो? माझ्या शेतकऱ्याला मी कशी मदत करू शकतो? पाण्याची बचत कशी करू शकतो ? ऊर्जा वाचवू शकतो का? कचरा कमी करू शकतो का? पर्यावरणाचेसंरक्षण करू शकतो का? यातून विज्ञानासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होते. विकसित भारताच्या निर्मितीत बालवैज्ञानिकांची भूमिका भारताला विकसित, आत्मनिर्भर आणि ज्ञानसमृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी मोठ्या संख्येने जिज्ञासू, सर्जनशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या तरुणांची आवश्यकता आहे.
आजचा बालवैज्ञानिक म्हणजे उद्याचा शास्त्रज्ञ, अभियंता, डॉक्टर, संशोधक, उद्योजक, शिक्षक, नवोन्मेषक किंवा धोरणनिर्माता. म्हणून बालविज्ञान परिषद ही केवळ मुलांसाठीची कृती नाही. ती भारताच्या वैज्ञानिक भविष्याची पायाभरणी आहे. अपयशाची भीती कमी होते वाढणाऱ्या आत्महत्या, सहज मिळणारे नैराश्य या आज वाढणाऱ्या बाबी आपयशाच्या भीतीने असतात राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभाग घेतल्याने अपयशाची जाणीव होते आणि त्याची भीती कमी होते. कारण वैज्ञानिक प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होत नाही. कधी प्रयोग फसतो. कधी अपेक्षित परिणाम मिळत नाही. कधी गृहीतक चुकीचे ठरते. परंतु विज्ञान सांगते- अपयश म्हणजे शेवट नाही; तो पुढील प्रयोगासाठी मिळालेला धडा आहे. NCSC विद्यार्थ्याला ही अत्यंत मौल्यवान जीवनदृष्टी देते.

“मी कोण आहे?” याचा शोध. : प्रत्येक मुलामध्ये काहीतरी विशेष क्षमता असते. कुणी निरीक्षणात हुशार असतो. कुणाला गणित आवडते. कुणी प्रयोग छान करतो. कुणी उत्तम माहिती शोधतो. कुणी सुंदर सादरीकरण करतो. कुणी उत्तम मॉडेल तयार करतो. कुणी नेतृत्व करतो. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद विद्यार्थ्याला स्वतःच्या या क्षमतांचा शोध घेण्याची संधी देते.
शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठीही विज्ञानाचे दार उघडे विज्ञानाची जिज्ञासा शाळेच्या भिंतींमध्ये बंदिस्त नसते. शेतात काम करणाऱ्या मुलाला विज्ञानाचे प्रश्न पडू शकतात. गावात राहणाऱ्या मुलाला विज्ञानाचे प्रश्न पडू शकतात. घरात शिकणाऱ्या मुलाला विज्ञानाचे प्रश्न पडू शकतात. म्हणून लागू असलेल्या परिषद नियमांनुसार पात्र असलेल्या शाळेत शिकणाऱ्या तसेच शाळेबाहेरील मुलांनाही वैज्ञानिक विचार मांडण्याची संधी उपलब्ध होणे ही या चळवळीची समावेशक भावना आहे. विज्ञानावर कोणाचाही एकाधिकार नाही. जिज्ञासा असणारा प्रत्येक बालक विज्ञानाचा विद्यार्थी आहे. विज्ञानात कोणी द्रोणाचार्य नाही त्यामुळे कोणी एकलव्य बनणार नाही.
सर्वात मोठा पुरस्कार कोणता? समजा तुमच्या प्रकल्पाला पुरस्कार मिळाला नाही. तरी तुम्ही काय मिळवले? तुम्ही प्रश्न विचारायला शिकलात. तुम्ही माहिती शोधली. प्रयोग केला. चूक केली. पुन्हा प्रयत्न केला. आकडेवारी समजून घेतली. निष्कर्ष काढला. लोकांसमोर उभे राहून स्वतःचे विचार मांडले. यापेक्षा मोठा पुरस्कार कोणता? पुरस्काराची ट्रॉफी काही दिवस चमकते. पण वैज्ञानिक विचार करण्याची क्षमता संपूर्ण आयुष्य उजळून टाकते.
बालवैज्ञानिकांसाठी एक स्वप्न
कल्पना करा- आज तुम्ही आपल्या गावातील पाण्याच्या समस्येवर प्रकल्प करता. उद्या तुम्ही जलव्यवस्थापनाचा अभ्यास करता. पुढे तुम्ही अभियंता किंवा वैज्ञानिक होता. आणि एका दिवशी तुमच्या संशोधनामुळे हजारो गावांना पाणी मिळते. किंवा- आज तुम्ही शेतातील एखाद्या छोट्या समस्येवर प्रयोग करता. उद्या तुम्ही कृषीशास्त्रज्ञ होता. आणि तुमच्या संशोधनामुळे शेतकऱ्याचा उत्पादनखर्च कमी होतो किंवा आज तुम्ही कचऱ्याच्या समस्येवर एक छोटासा प्रयोग करता. उद्या तुमची कल्पना मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ही स्वप्ने अशक्य नाहीत. प्रत्येक मोठ्या संशोधनामागे कधीतरी एक छोटासा प्रश्न असतो.
बालवैज्ञानिक, तुला सर्व उत्तरे माहीत असण्याची गरज नाही. तुला मोठी प्रयोगशाळा असण्याची गरज नाही. तुला महागडी उपकरणे असण्याची गरज नाही. तुला फक्त जिज्ञासा हवी. प्रश्न विचारण्याचे धैर्य हवे. प्रयोग करण्याची तयारी हवी आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती हवी. तुझ्या घराभोवती पाहा. तुझ्या शाळेकडे पाहा. तुझ्या गावाकडे पाहा. तुझ्या शेताकडे पाहा. तुझ्या नदीकडे, विहिरीकडे, आकाशाकडे पाहा. एखादा प्रश्न शोध. त्या प्रश्नामागचे विज्ञान शोध. प्रयोग कर. निष्कर्ष काढ. आणि मग आत्मविश्वासाने जगाला सांग- “हा माझा प्रश्न आहे. हा माझा प्रयोग आहे. हा माझा निष्कर्ष आहे. आणि ही माझ्या भारतासाठीची माझी कल्पना आहे!
राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २०२६ प्रत्येक बालकात एक वैज्ञानिक दडलेला आहे. NCSC त्या वैज्ञानिकाला जागे करण्याची संधी आहे. आजचा प्रश्न उद्याचा शोध आजचा प्रयोग उद्याची कल्पना आजचा बालवैज्ञानिक उद्याचा भारत घडवणारा वैज्ञानिक चला, प्रश्न विचारूया… प्रयोग करूया… स्वप्ने पाहूया… आणि भारत घडवूया ! राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २०२६ “विज्ञान शिका नाही-विज्ञान जगा!
डॉ.नितीन ओक शिक्षण क्षेत्रातील एक प्रवासी, सीऱ्याकूस विद्यापीठ usa मधून डॉक्टरेट नासा मध्ये educator त्यानंतर साधारण तीन दशक शिक्षण क्षेत्रात आयआयटी, प्रख्यात संशोधन संस्था, मेडिकल क्षेत्रात नावाजलेल्या संस्था येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्या (आणि तिथे नेत्रदीपक यश मिळवण्या) योग्य शिक्षण देऊन आता राज्य शिक्षण विभाग, अकोला शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, विज्ञान भारती, अश्या संस्था द्वारे आणि डॉ. राजकुमार अवसरे, डॉ. रवींद्र भास्कर, सारख्या व्यक्तिमुळे कसे शिकवायचे आणि कसे शिकायचे याचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना निशुल्क मार्गदर्शन
उपक्रम निशुल्क असून याच्या नोंदणीची शेवटची तारीख 15 ऑगस्ट आहे. यात विद्यार्थी सरळ जिल्हा स्तरावर नंतर राज्य आणि तिथून थेट राष्ट्रीय स्तरावर जातो. या उपक्रमात शाळेत जाणारे न जाणारे, दिव्यांग अथवा साधरण कोणताही 10 वर्ष ते 17 वर्षाचा विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. या उपक्रमाचे स्थानिक समन्वयक कतुहलसंस्कार केंद्राद्वारे वैजयंती नरेंद्र पाठक (9822565881) आणि शैक्षणिक समन्वयक नितीन ओक (9890698139) आहेत.
लेखक : नितीन ओक या, जठारपेठ रोड, अकोला 444005