अकोला दिव्य न्युज ब्युरो : आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येत असताना त्यांच्या नावावर असलेले अकोला शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाच्या अतिशय दयनीय अवस्थेकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या संपूर्ण परिसरात साफसफाई अभियान सुरू करण्यात आले आहे. हीच राजमातेला खरी आदरांजली आहे, अशी प्रतिक्रिया या मार्गाने जाणारे व्यक्त करत आहेत.
यासोबतच शहरातील इन्कम टॅक्स, तुकाराम चौक,कौलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक बायपास, शिवसेना वसाहत चौक, जय हिंद चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिव्हील लाईन्स चौक, मोठी उमरी चौक, अण्णाभाऊ साठे,रेल्वे स्टेशन चौक दोन्ही साईड, हनुमान चौक अकोट फैल, जठारपेठ चौक, शिवाजीपार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवणी चौक, रतनलाल प्लॉट चौक,महाकाली/नेहरू पार्क चौक आणि शिवर चौक येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, मॉं साहेब राजमाता जिजाऊ सभागृह ही अकोल्याच्या वैभवात भर घालणारे वास्तू आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या सभागृहाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या सभागृहाची साफसफाई व्हावी आणि पवित्रता कायम राखण्यासाठी शासनाने योग्य पावली उचलावी. यासाठी आज शुक्रवार १२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहरातील विविध भागात सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानात लोक आपला अभिप्राय देखील नोंदवून घेत असल्याचे दिसून येते. साफसफाई आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर, प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे,सचिन शिराळे, राजकुमार दामोदर, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, पश्चिम कार्याध्यक्ष मजहर खान, पुर्व युवा अध्यक्ष जय तायडे, शोभाताई शेळके, किरणताई बोराखडे, अँड नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिवसोबत वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी,युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केले.