अकोला दिव्य न्यूज : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या किमतींमधील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरांचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. गेल्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ असून, यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. आज सोमवार, २५ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपये तर डिझेलच्या किमतीत २.७१ रुपये प्रति लीटरची मोठी वाढ करण्यात आली आहे.

या नव्या वाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलने अखेर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला असून ते १०२.१२ रुपये झाले आहे, तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.
सीएनजी (CNG) धारकांनाही मोठा फटका
केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर वाहन चालक आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीएनजीच्या (CNG) दरातही २३ मे रोजी १ रुपया प्रति किलोची वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी वाढ असून, आतापर्यंत सीएनजी एकूण ४ रुपयांनी महागला आहे.
मालवाहतूक महागणार, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या या वाढीमुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (मालवाहतूकदार) आणि सर्वसामान्य वाहनधारकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. डिझेल महागल्यामुळे येत्या काही दिवसांत भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महाग होऊन बाजारात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
