अकोला दिव्य न्युज ब्युरो : मी गुजराती असल्याचा मला अभिमान आहे. ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील, असे रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात हरित नोकऱ्या निर्माण होतील आणि हरित उत्पादने आणि सामग्रीचे उत्पादन सक्षम होईल, ज्यामुळे गुजरात हरित उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार राज्य बनेल. गुजरातला आपली मातृभूमी आणि कार्यस्थळ असल्याचे सांगताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या १० वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. ७ कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही.
नरेंद्रभाई मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, आमचे प्रिय नेते आणि सध्याच्या काळात महान जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. ते भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत.परदेशातील माझे मित्र मला विचारतात की लाखो भारतीय ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणा देत आहेत, त्याचा अर्थ काय आहे? मी त्यांना सांगतो याचा अर्थ असा, की भारताचे पंतप्रधान त्यांच्या दूरदृष्टीने, दृढनिश्चयाने अशक्य ते सर्व शक्य बनवतात, असंही मुकेश अंबानी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन केले. ही व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट १० ते १२ जानेवारी दरम्यान चालणार आहे. या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम ‘गेटवे टू द फ्युचर’ आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची ही दहावी आवृत्ती आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये ३४ देश आणि १६ संस्था सहभागी होत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची पहिली आवृत्ती २००३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. २००३ साली तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते या शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी देशाचे विद्यमान पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.