नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. इतर देशातील व्यक्ती किंवा पदाधिकारी आपल्या पंतप्रधानांविरोधात वक्तव्य करत असतील तर ते मान्य केलं जाणार नाही. पंतप्रधान पदाचा आपण सर्वांनीच आदर केला पाहिजे. देशाबाहेरील व्यक्तीकडून पंतप्रधानांचा अपमान झाला तर आम्ही ते स्वीकारणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर लक्षद्वीप विरुद्ध मालदीव अशी तुलना सुरू झाली. मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांवर टीका केली. यावरून भारत विरुद्ध मालदीव असं शाब्दिक युद्ध चालू झालंय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताशी पंगा घेतल्याने मालदीवला मोठा फटका बसला आहे. मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकांचे बुकिंग रद्द केल्यानंतर आणि ट्रॅव्हल कंपन्यांनी विरोध केल्यानंतर आता मालदीवच्या टुरिझम असोसिएशननेही आपल्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने एक निवेदन जारी करून आपल्या मंत्र्यांच्या भारतीय पंतप्रधान आणि भारतातील लोकांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
मालदीवच्या टीकेविरोधात भारतीय एकवटलेपंतप्रधानांवरील अपमानास्पद टीका आणि नागरिकांवरील वर्णद्वेषी टीकेनंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला. तसेच भारतीय नागरिकांकडून मालदीववर बहिष्कार घालण्याचं, पर्यटनासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीववारी रद्द केली आहे. तसेच भारतातल्या काही आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेले बुकिंग्स रद्द केले आहेत. परिणामी, मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे.