अकोला दिव्य न्यूज : भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या ‘भारतीय संविधानाचे’ आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन करण्यात आले असून, या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात महत्वाचे म्हणजे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिशभाई आलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याच्या शिष्टमंडळाने या राष्ट्रीय सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवून जिल्ह्याची मान उंचावली. यावेळी अकोल्याचे खा.अनुप धोत्रे यांची विशेष उपस्थिती होती.

सिंधी भाषा दिनाचे औचित्य साधून भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात भारतीय संविधानाच्या सिंधी भाषेतील अधिकृत आवृत्तीचे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात विमोचन करण्यात आले. सिंधी समाजाच्या इतिहासात हा क्षण सुवर्णअक्षरांनी कोरला जावा असा ठरला असून, याप्रसंगी अकोल्यातील सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने विशेष उपस्थिती दर्शवली..

सिंधी भाषेतील हे संविधान देवनागरी आणि फारसी अशा दोन्ही लिपींमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून भाषेचा वारसा जपला जाईल. सिंधीसमाज संघर्षातून उभा राहिलेला समाज आहे. फाळणीनंतर विखुरलेल्या या समाजाला मातृभाषेनेच एकत्र बांधून ठेवले. मातृभाषेत संविधान असल्याने शेवटच्या व्यक्तीपर्यंत लोकशाहीची मूल्ये पोहोचण्यास मदत होईल. असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी सिंधी समाजाच्या संघर्षाचा आणि जिद्दीचा गौरव केला. फाळणीच्या वेदना सहन करणार्या सिंधी समाजाला त्यांच्या मातृभाषेनेच एकत्र ठेवले आणि त्यांची ओळख टिकवून ठेवली, असे प्रतिपादन त्यांनी केले. मातृभाषेत संविधान उपलब्ध झाल्यामुळे लोकशाही प्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अकोल्यातील सिंधी बांधवांची उपस्थिती
या कार्यक्रमाला केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी, आणि खासदार शंकर लालवानी यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती. अकोला सिंधी समाजाच्या या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. हा क्षण संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. अकोल्यातून माजी नगराध्यक्ष व अकोला थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष हरिश आलिमचंदानी, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष रमेश जग्यासी, विनोद मनवानी, सुरेश संतानी, हरीश कटारिया, कन्हैयालाल आहुजा, कमल आलिमचंदानी, इंजि.संदीप आलिमचंदानी यांची उपस्थिती होती..
