Thursday, April 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील सेवा कार्याच्या वाटेवर 'वेदश्री प्रतिष्ठान' चा प्रेरणादायी प्रवास

अकोल्यातील सेवा कार्याच्या वाटेवर ‘वेदश्री प्रतिष्ठान’ चा प्रेरणादायी प्रवास

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरालगतच्या मलकापूर येथील ‘उत्कर्ष शिशु गृह’ हे ‘जिथे नैराश्याच्या अंधाराला भेदून एक नवा प्रकाश जन्माला येतो’ असं ठिकाण आहे. जन्मतःच आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या निरागस बालकांच्या आयुष्यातील एक ‘नवा अध्याय’ आहे.बालके हे ईश्वराचेच रूप असतात आणि त्यांची निस्वार्थ सेवा करणे हीच ईश्वराची खरी भक्ती होय.असं म्हटले जाते ते उगीच नाही. आणि याच संवेदनशील भावनेने प्रेरित होऊन, वेदश्री प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ सदस्यांनी ‘उत्कर्ष शिशु गृहा’ला भेट दिली.

गेली १५ वर्षे, ‘उत्कर्ष शिशु गृह’ आणि ‘गायत्री बालिका आश्रम’ ही नावे सेवेची समानार्थी बनली आहेत. येथे केवळ बालकांचे संगोपनच नाही, तर त्यांच्या शिक्षणापासून ते विवाह आणि जबाबदार नागरिक बनण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अत्यंत आपुलकीने पार पाडला जातो. वर्षभर ‘दत्तक ग्रहण समारंभ’, ‘स्थापना दिवस’, ‘गणेशोत्सव” ‘जन्माष्टमी’, ‘रामनवमी’ आणि ‘शारदा उत्सव’ यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथै आयोजन केले जाते.

गेली सात वर्षे कमलेश कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वेदश्री प्रतिष्ठान’चे कलाकार “वैदिक विवाह सोहळे” संपन्न करून देत आहे. या कार्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून कलाकारांचे मानधन दिल्यावर रक्कम अनाथ मुलींच्या विवाह आणि विविध सामाजिक कार्यांसाठी वापरली जाते.

या सेवा मालिकेत, उत्कर्ष शिशु गृहातील लहान मुलांसाठी वर्षभर दुधाची पावडर आणि जीवनावश्यक औषधांचा भार उचलण्याची वेदश्री प्रतिष्ठानने घेतलेली प्रतिज्ञा आज संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे योगदानाची रक्कम सुपूर्द करून पूर्ण करण्यात आली.यावेळी कमलेश कोठारी, दीपक कोठारी जयंत देशपांडे, आनंद जहागीरदार, प्रवीण पाचघरे, राजेश जोशी, शुभम बालिंगे आणि ‘प्रस्थान’ कडून प्रा.डॉ. नाना विठ्ठलराव भडके विशेष उपस्थित होते.

उत्कर्ष शिशु गृहाचे प्रतिनिधी म्हणून चंद्रप्रकाश लढ्ढा, गणेश कळकर हेमंत चौधरी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते, ज्यांच्या हाती ही वर्गणीची रक्कम सुपूर्द करण्यात आली. या समाजसेवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचेच फळ आहे की, आज हा आश्रम एखाद्या ‘मंदिराप्रमाणे’ समाजाला एक नवी दिशा देत आहे. उत्कर्ष शिशु गृह हे केवळ एक निवारास्थान नसून, मुलांचे भविष्य घडवणारी एक धगधगती ज्योत आहे.

आज घरी परतताना वेदश्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या ओठांवर एकच प्रार्थना होती. ती म्हणजे………. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना। हम चले नेक रस्ते पे हम से, भुल कर भी कोई भुल हो ना।

मनोगत : विठ्ठलसूत प्रा डॉ नाना विट्ठलराव भड़के, अकोला, 9518572502, 7720033936

टीप : प्रा.डॉ.भडके यांनी आपल्या भावभावनांचा उहापोह हा ‘हिंदी’ भाषेत केला आहे. तर अकोला दिव्य न्यूज वेबसाइटचे वाचक हे मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक असल्याने, प्रा.डॉ.भडके यांचे मनोगत खास मराठीमध्ये शब्दबद्ध केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!