Sunday, November 24, 2024
Homeताज्या बातम्याआ.गोवर्धन शर्मा यांचे देहावसान ! विदर्भात शोककळा : अकोलेकरांचा हितचिंतक हरवला

आ.गोवर्धन शर्मा यांचे देहावसान ! विदर्भात शोककळा : अकोलेकरांचा हितचिंतक हरवला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला विधानसभा आणि नव्याने गठीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे गत २५ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आ.गोवर्धन मांगीलालजी शर्मा यांचे आज शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अकोला शहर व जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, कृष्णा व अनुप ही दोन मुले, सून, नातवंडासह मोठे आप्तेष्ट, मोठा मित्रपरिवार आहे.उद्या शनिवार ४ नोव्हेंबर रोजी अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. लालाजी नावाने महाराष्ट्र राज्यातील राजकारणात, समाजकारणात परिचित असलेले लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मांना अलिकडच्या काळात कर्करोगाने ग्रासले होते. जवळपास १५ दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथून अकोला येथील त्यांच्या घरी आणले होते.आज रात्रीला प्रकृती चिंताजनक होऊन त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षांत निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वच समाजातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, उद्योजक, भाजपाचे ज्येष्ठ, कनिष्ठ नेते, कार्यकर्त्यांसह अकोलेकरांच्या भावना अनावर झाल्या. त्यांच्या घरी हितचिंतकांची एकच गर्दी झाली आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पक्षासोबत एकनिष्ठ लोकनेते असा त्यांचा लौकिक आहे.‌पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे व लोकप्रतिनिधी घडवणारे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, खा.संजयभाऊ धोत्रे, यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.जुने शहरातील नगरसेवक ते महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व यवतमाळ जिल्हा पालकमंत्रीपर्यंतची त्यांची राजकीय कारकीर्द निर्विवाद आहे.

श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून सातत्याने मदतीचा हात देणारे पश्चिम विदर्भातील ते एकमेव नेते होते. रामदेव बाबा शामबाबा मंदिर ट्रस्टी, सालासर हनुमान मंदिर ट्रस्टी, बहुभाषिक ब्राह्मण समाज परशुराम जयंती उत्सव, सामुहिक विवाह, परिचय संमेलन, मारवाडी संस्कृत विद्यालय इत्यादी अनेक उपक्रम आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले.

2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार गोवर्धन शर्मा यांना 66 हजार 934 मते मिळाली होती. तर 2019 ला शर्मा यांना 70 हजार 291 मते प्राप्त झाली.पक्षाचे तगडे नेटवर्क आणि संकटसमयी मतदारांनी तारल्याची बाब गोवर्धन शर्मा यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती समोर आले होते. या निवडणुकीत सलग सहाव्यांदा गोवर्धन शर्मा विजयी झाले.

(सविस्तर वृत्त लवकरच)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!