अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील उच्चभ्रू ग्राहकांसाठी ‘हायप्रोफाइल’ देहविक्री व्यवसायात चक्क विदेशी महिलेचा वापर केला जात असल्याचा अत्यंत खळबळजनक व घृणास्पद प्रकरण उघडकीस आले आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या ‘हाय-प्रोफाईल’ सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. तेव्हा एक पीडित महिला चक्क आफ्रिका खंडातील टांझानिया येथील रहिवासी असल्याचे उघड झाले.या प्रकरणी कारवाई करून विदेशी महिलेसह तीन महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे गोरक्षण रोडवरील उच्चभ्रू वस्तीत जवळपास एक वर्षापूर्वी पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता.

प्राप्त माहितीनुसार, उच्चभ्रू वस्तीत असलेल्या या फ्लॅटमध्ये मागील काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय हा अनैतिक धंदा छुप्या पद्धतीने सुरू होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाद्वारे तरुणींचे फोटो प्रसारित केले जात. त्यानंतर व्यवहाराची निश्चिती करण्यासाठी थेट संपर्क साधला जात असे.प्राथमिक तपासात असे समोर आले की, प्रत्येक ग्राहकाकडून साधारणपणे ३ ते ४ हजार रुपये आकारले जात होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, खदान पोलिसांनी सापळा रचला आणि संबंधित अपार्टमेंटच्या फ्लॅटवर धाड टाकली.
या धाडीदरम्यान, एक पुरुष आणि एक परदेशी नागरिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.उच्चभ्रू ग्राहकांना लक्ष्य करून तळमजल्यावरील देहविक्रीचे जाळे चालवले जात असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनास्थळी जवळपास दीड ते २ तास लोकांचा मोठा जमाव दिसून आला.

छापेमारीदरम्यान दस्तऐवज आणि साहित्य जप्त
रॅकेटमध्ये परदेशी महिलांचा समावेश आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. छापेमारीदरम्यान घटनास्थळावरून काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले. या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि मनोज केदारे यांच्या पथकाने केली आहे.
