अकोला दिव्य न्यूज : शहराच्या झोपडपट्टी परिसरातील गरजू व वंचित मुलांसाठी विशेष उपक्रम राबवित मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसाच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहर महिला काँग्रेस अध्यक्ष कशीश खान यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये अंदाजे १२५ पेक्षा जास्त मुलांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत म्हणून या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व त्यांच्या भविष्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे अकोला शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशिश खान यांनी सांगितले.
झोपडपट्टी परिसरातील लोकांच्या कुटुंबांना कोणत्याही मूलभूत सुविधा नसतानाही त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उत्सुकता दिसून आली. त्यांच्या या जिज्ञासाला प्रोत्साहन देत या मुलांना नियमित शैक्षणिक सुविधा व संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन या प्रसंगी महिला काँग्रेसतर्फे देण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित ‘शिका, संघटित व्हा आणि पुढे चला’ या संदेशाचा प्रसार करण्यात आला. ‘शिका भारत, घडवा भारत’ या संकल्पनेला अनुसरून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी नगरसेविका सुवर्णा रेखा जाधव, शहाना शेख, ताबींदा अहमद अली, नलीनी इंगळे, अॅनी इंगळे, सलमा खान, उजमा खान तसेच महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवला.
