•स्वामी हरिचैत्यानंद सरस्वती महाराजांची ग्वाही•
अकोला दिव्य न्यूज : ज्ञान दानाच्या पवित्र क्षेत्रात सध्या मूल्यवर्धित शिक्षणाचा प्रकर्षाने अभाव दिसून येत असताना ऑलिंपस पब्लिक स्कूलने नेमके ही बाब हेरून अकोला शहर व परिसरात मूल्यवर्धित शिक्षण देण्याचा घेतलेला वसा निश्चितच दिलासा देणारी बाब आहे. येणाऱ्या काळात ऑलिंपस पब्लिक स्कूलमधून उद्याचा आदर्श विद्यार्थी घडेल, यामध्ये मला मुळीच शंका नाही असा विश्वास स्वामी हरिचैत्यानंद सरस्वती महाराज पळसखेड सपकाळ यांनी व्यक्त केला.

बाळापूर रोड वरील राधास्वामी सत्संग ब्यास समोर नव्यानेच सुरू झालेल्या ऑलिंपस पब्लिक स्कूलच्या उद्घाटन पर कार्यक्रमात आशीर्वाचन देताना बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक सुभाषचंद्र लढ्ढा उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष CA मनोज चांडक यांनी ऑलिंपस पब्लिक स्कूल सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली की अकोला शहरातील सर्व वर्गातील मुलांना मूल्यवर्धित शिक्षण मिळावे. फक्त अभ्यासाची पोपटपंची न करता विद्यार्थ्याच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून ‘कृती आधारित’ शिक्षण मिळावे. भारतीय संस्कृती, कला यांची ओळख अगदी बालपणातच व्हावी या प्रमुख उद्देशाने ही शाळा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती दिली.
प्रमुख पाहुणे सुभाषचंद्र लढ्ढा यांनी सांगितले की, शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा हा उच्च प्रतीचा राहील यात कोणतीही शंका नाही आणि शाळेला भविष्यात आमचे पदोपदी सर्व प्रकारचे सहकार्य राहील.

स्वामी हरिचैत्यांनंद सरस्वती महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय अकोला पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांनी तर लढ्ढा यांचा जीवन परिचय खंडेलवाल सिल्वरचे संचालक प्रतीक राठी यांनी करून दिला.कार्यक्रमानंतर फित खोलून श्रीफळ फोडून स्वामी हरिचैत्यांनंद सरस्वती महाराज व सुभाषचंद्र लढ्ढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते सरस्वती मातेच्या मूर्ती जवळ दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित अकोलकरांनी शाळेची इमारत व तेथील व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
संचालक मंडळातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष CA मनोज श्रीकृष्ण चांडक, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मदन गोपाल राठी, सचिव ऋत्विक गजानन शेळके, कोषाध्यक्ष अनुराग जितेंद्र तिवारी, सहसचिव वंशिका विनीत बियाणी, सहकोषाध्यक्ष प्रीती नितेश पंडित आणि संचालक रजत मनोज चांडक, प्रीती गजानन शेळके, दीपिका प्रतीक राठी, प्रतीक्षा पुरुषोत्तम राठी, टिशा मनोज राठी हजर होते.
