गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लहानपणापासूनच क्रिकेट खेळ आणि क्रिकेटसाठी जीव वेडापिसा असलेला कॅल सोमाणी या नावाने आज क्रिकेट विश्वात व जगात खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेट विश्वातील आयपीएल या स्पर्धा प्रकारात 1.63 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 15 हजार 300 कोटी रुपयात राजस्थान रॉयल्स संघाला खरेदी करून कॅल सोमाणी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोमाणी हे नाव लौकिक केले आहे. लहानपणापासूनच क्रिकेट विश्वात आपले नाव कोरले जावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कॅल सोमाणी यांनी अखेर काल आपले स्वप्न साकार केले. लहानग्या पासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर आज ‘कॅल सोमाणी’ हे नाव आहे. पण नेमके कॅल सोमाणी कोण आणि कुठले ? ही माहिती देशातील कुठल्याही माध्यमातून समोर आले नाही.पण अकोला दिव्य परिवार आज विनम्रपणे पण मोठ्या स्वाभिमानाने सांगत आहे की, कॅल सोमाणी हा आमच्याच वाशिमकर सोमाणी परिवाराचा एक अविभाज्य अंग आहे.

हो, कॅल सोमाणी यांचा जन्म वाशिम शहरात देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी अर्थात १५ ऑगस्ट १९७४ रोजीचा आहे. आमच्या सोमाणी कुटुंबांतील एक कुटुंब जे बंगलावाला सोमाणी म्हणून ओळखले जाते. या बंगलावाला सोमाणी परिवारातील स्व.भगवानदास सोमाणी यांच आणि कैलास यांचे रक्ताचे नाते आहे. अमेरिकेचे कॅल म्हणजे आमच्या कैलासचे वडील स्व. नंदकिशोर सीताराम सोमाणी यांचं लहानपणापासूनच स्व. भगवानदास सोमाणी यांच्या घरात वास्तव्य होते. स्व.भगवानदासजी यांनी देखील नंदकिशोरजी यांच आपल्या मुलांप्रमाणेच संगोपन केले.
नंदकिशोरजी यांच लग्नाचं वय झाले आणि योग्य स्थळ शोधून भगवानदासजींनी त्यांच लग्न लावून देत संसार थाटून दिला.
स्व. नंदकिशोरजी यांना तीन अपत्ये होती. त्यामध्ये एक मुलगी रश्मी, मोठा मुलगा सुबोध (आज अमेरिकेत कैलास सोबत स्थायिक) आणि दुसरा मुलगा कैलास म्हणजेच कॅल सोमाणी.
नंदकिशोरजींच्या घराची परिस्थिती जेमतेमच होती. तर कैलासच वय १६ वर्षांचं असताना नंदकिशोरजी यांच निधन झाले. क्रिकेटची लहानपणापासूनच कैलासला आवड पण घरी टीव्ही नाही ! आपलं स्वप्न उराशी बाळगून कैलास यांनी वाशिम येथील मुळीबाई चरखा विद्यालय येथून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. यानंतर शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त केली. दरम्यान कैलास यांचे मोठे भाऊ सुबोध नोकरीमुळे अमेरिका येथे गेले होते.

संगणक अभियंता झाल्यानंतर कैलास देखील अमेरिकेला गेले.तेथे कैलाश यांनी आपल्या नोकरीची सुरुवात आयोवा राज्यातील सीडर रॅपिड्स येथे केली. त्यानंतर ॲरिझोना राज्यात स्थलांतरित होऊन आपला व्यवसाय सुरू केला. प्रचंड मेहनतीच्या बळावर कैलास यांनी यशाचे शिखर गाठले.आज तंत्रज्ञान विश्वात कैलास एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहेत. एडटेक (EdTech), डेटा गोपनीयता, एआय (AI) प्रशासन आणि क्रीडा तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. पण क्रिकेट पिछा सोडत नव्हते. तेव्हा अकोला ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव (श्यामजी पंत) येथे क्रिकेट अकादमीची स्थापना केली. या अकॅडमीचे ते मार्गदर्शक असून अकॅडमीतील गरीब उमेदवारांचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये दिले आहेत.
अमेरिका व्याकरणात कै. हा शब्द नसल्याने आमच्या वाशिमचा कैलास अमेरिकेत कॅल सोमाणी म्हणून ओळखले जात आहे. कैलासची सासरवाडी सोलापूर शहराची असून त्यांचा मुलगा अजिंक्य हा १४ वर्षांखालील गटात गोल्फ खेळाचा विश्वविजेता आहे. ही बाब केवळ सोमाणी कुटुंब, वाशिमसाठी गौरवशाली, अभिमानास्पद नव्हे तर पश्चिम विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नावलौकिक करणारी आहे.
टीप : पुर्व परवानगी शिवाय मजकूर घेवू नये. अकोला दिव्य मधील मजकूर कॉपीराइट अंतर्गत दाखल आहे तेव्हा कट पेस्ट ही करू नये.
