अकोला दिव्य न्यूज : उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शहरात तापमानाचा पारा ४१ डिग्री सेल्सिअस पर्यंत चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर दुचाकी चालक व नागरिकांना उन्हातच ताटकळत उभे राहावे लागते. या गंभीर समस्येची दखल घेत न्यू तापडिया नगर येथील रेल्वे गेटवर वाहनचालकांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी ग्रीननेट लावून सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामुळे रेल्वे फाटक बंद असताना उन्हात थांबणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून वाहनचालकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. उन्हाच्या झळा कमी व्हाव्यात आणि नागरिकांना थोडीशी का होईना आरामदायी व्यवस्था मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. या कामासाठी अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, अँड. धनश्री देव रुग्ण कल्याण उपकरण बँक तसेच निलेश देव मित्र मंडळ यांनी सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली.
विशेष म्हणजे हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी अशी सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी निलेश देव यांच्याकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम पुन्हा राबविण्यात आला आहे.
उन्हाच्या कडाक्यात रेल्वे फाटकाजवळ थांबणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेली ही सावली निश्चितच दिलासा देणारी ठरत असून, नागरिकांकडून या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
