अकोला दिव्य न्यूज : परदेशी चलन मिळवून देण्याचे व भारतीय रुपयांचे डॉलरमध्ये रूपांतर करण्याचे आमिष दाखवून अकोला येथील एका दाल मिल व्यापाऱ्याची तब्बल ४८ लाख ८२ हजार ६०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात बंगळुरू येथील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला येथील औद्योगिक वसाहत मधिल लक्ष्मीनारायण डाळ मिलचे संचालक आणि गोरक्षण रोड भागातील विद्या नगर येथे राहणारे रोहन अशोक बियाणी जुलै २०२५ मध्ये व्यवसायानिमित्त बंगळुरू येथे गेले होते. बंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांची नेहा जैन आणि राघव देसाई या दोघांशी ओळख झाली.
या दरम्यान दोघांनी आपण परदेशी चलन व्यवहाराचे तज्ज्ञ असून भारतीय रुपयांचे अमेरिकन डॉलरमध्ये कायदेशीररीत्या रूपांतर करून देतो, असे बियाणी यांना सांगितले. तर चर्चेत आपल्याला ऑस्ट्रेलियातून कडधान्य आयात करण्यासाठी डॉलरमध्ये पैसे द्यायचे होते.अशी माहिती बियाणी यांनी दिली. नेमकं या माहितीचा फायदा घेत आरोपींनी त्यांना https://ryochain.net या वेबसाईटवर खाते उघडण्यास सांगितले.
आरोपींच्या सांगण्यावरून बियाणी यांनी २५ नोव्हेंबर २०२५ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत युपीआय आणि आरटीजीएस द्वारे एकूण ४८ लाख ८२हजार ६०० रुपये आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केले. सुरुवातीला या वेबसाईटवरील वॉलेटमध्ये डॉलरची रक्कम वाढल्याचे दिसत होते. मात्र, १२ डिसेंबर २०२५ रोजी बियाणी यांनी वॉलेट उघडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे ‘लॉगिन’ बंद झाले होते. त्यांनी आरोपी नेहा जैन आणि राघव देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपींनी उलट त्यांच्याकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली.
आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच बियाणी यांनी पैसे परत मागितले, मात्र त्यानंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन बंद करून संपर्क तोडला. अनेक प्रकारे आरोपींना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. अखेर रोहन बियाणी यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. खदान पोलिसांनी बंगळुरु येथील आरोपी नेहा जैन आणि राघव देसाई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१६ (२), ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक मनोज केदारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
