अकोला दिव्य न्यूज : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या संयोजकपदी समीर थोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे समितीच्या कार्याला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. समितीच्या माध्यमातून देशभक्तीची भावना दृढ करणे, तसेच भारतीय परंपरा, संस्कृती आणि सण-उत्सवांचे महत्त्व जागृत करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. समाजात सांस्कृतिक जाणीव वाढवून एकात्मतेचा संदेश देण्याचा समितीचा प्रयत्न असतो.

सामाजिक क्षेत्रात समीर थोडगे यांनी यापूर्वीही उल्लेखनीय कार्य केले असून विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनात त्यांचा पुढाकार राहिला आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा, अखंड भारत दिन आणि महालक्ष्मी आरास स्पर्धा यांसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नियुक्तीच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ.आर.बी. हेडा, डॉ.पार्थ सारथी शुक्ल, अरविंद देठे, विनोद देव, निलेश देव महेश जोशी यांच्यासह स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, मीनाक्षी अपोतीकर, शरद वाघ, सितल जैन, जस्मित ओबेरॉय, पंकज सहगल, रुपेश वाखारकर, अभय राजपूत, जय राणे, पंकज सादराणी, उपस्थित होते. या प्रसंगी समितीचे सदस्य नवनिर्वाचित नगरसेवक निलेश देव यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी समीर थोडगे यांना शुभेच्छा देत समितीच्या आगामी कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
समितीच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून आगामी काळात सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले.

