अकोला दिव्य न्यूज : शिवजयंती केवळ उत्सव नाही, सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा आहे, याची प्रचिती अकोल्यात पुन्हा एकदा आली. शिवजयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या ‘डोनेट युवर सायकल’ या नाविन्यपूर्ण उपक्रमातील सायकल वितरण सोहळा यंदा दुसऱ्या वर्षीही उत्साहात संपन्न झाला. अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जठार पेठ येथील कार्यालयात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीपराव देशपांडे होते. प्रमुख उपस्थिती नरेंद्र देशपांडे, वैशाली देशपांडे, डॉ.स्नेहा गोखले, प्रा.रश्मी देव, वैशाली भारसाकळे यांची लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंतराव सरदेशपांडे तर आभार प्रदर्शन अजय शास्ती यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कैलास तिरपुडे, विजय वाघ, संजय देशमुख, राम उमरेकर, दत्ता भांबेरे यांनी केले. नगरसेवक निलेश देव, राजेंद्र गुणलवार,अरुण गौतमे, नरेंद्र परदेशी, आशु यादव, निलेश दुधलम, विनोद पाटील, संतोष लोढे, सावंत मेजर, शिरीष पुसेगावकर यांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुसूदन पसारकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विराज नितीन गव्हारे याचा पाचव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी शहरातील विविध शाळा व सामाजिक संस्थांकडून गरजू विद्यार्थ्यांची नावे मागविण्यात आली होती. पारदर्शक प्रक्रियेद्वारे पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. दररोज लांब अंतर पायी चालत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः मुलींसाठी हा उपक्रम शिक्षणाचे सातत्य, सुरक्षितता व आत्मविश्वास वाढविणारा ठरत आहे.

शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करत सामाजिक उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.
सायकलची आनंदयात्रा
गायत्री बालिका आश्रमच्या मुलींनी मिळाल्यानंतर या विद्यार्थिनींनी जठारपेठ ते मलकापूर असा सायकल प्रवास करत उपक्रमाला वेगळेच आकर्षण दिले. नव्या सायकलसह उत्साहात निघालेल्या या आनंदयात्रेने लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद, आत्मविश्वास आणि शिक्षणाबद्दलची जिद्द पाहून उपस्थितांनाही समाधानाची भावना लाभली. सायकल ही आमच्यासाठी केवळ साधन नाही, तर आमच्या स्वप्नांची गती आहे, अशा भावना मुलींनी व्यक्त केल्या.
