Monday, February 16, 2026
No menu items!
No menu items!
Homeविकासाच 'अकोला मॉडेल' !भविष्यासाठी दिशा : एक निष्कर्ष

विकासाच ‘अकोला मॉडेल’ !भविष्यासाठी दिशा : एक निष्कर्ष

अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील औद्योगिक व कृषी क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र म्हणून अकोल ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती स्थान, रेल्वे व रस्ते जोडणी, उपलब्ध कृषी उत्पादन आणि संतुलित हवामान या सर्व घटकांमुळे येथे उद्योगविकासाला नैसर्गिक आधार मिळाला आहे. मात्र अकोल्याच्या औद्योगिक विकासाची खास वैशिष्ट्ये म्हणजे येथे निर्माण झालेला निसर्गपूरक व संतुलित उद्योग !

औद्योगिक रचना आणि वैशिष्ट्ये
अकोला औद्योगिक वसाहतीत सुमारे १ हजार ३०० लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये प्रामुख्याने कृषीपूरक प्रक्रिया उद्योगांचा मोठा वाटा आहे. विशेषतः दाल मिल उद्योग औद्योगिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कृषी उत्पादन आधारित व कमी प्रदूषण करणारे उत्पादन प्रक्रिया उद्योग, स्थानिक रोजगार निर्मिती, पारंपरिक कौशल्ये वआधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय या माध्यमातून अकोला शहराने मोठ्या व प्रदूषणकारी उद्योगावीना आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे.

पर्यावरण संतुलन आणि औद्योगिक धोरण
अनेक शहरांमध्ये औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि आरोग्याच्या समस्या वाढताना दिसतात. परंतु अकोल्यात आतापर्यंत या तुलनेने स्वच्छ हवा, मोकळे वातावरण आणि संतुलित जीवनशैली जपली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, मोठ्या रसायन उद्योगांचा अभाव, कृषी-आधारित प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन
स्थानिक संसाधनांचा नियंत्रित वापर आहे. ही दिशा भविष्यातील औद्योगिक धोरणासाठी महत्त्वाची ठरू शकते.
शेती–उद्योग–शिक्षण यांचा संगम
अकोल्यातील औद्योगिक विकास केवळ उत्पादनापुरता मर्यादित नाही. तर तो शेती आणि शिक्षणाशीही जोडलेला आहे.शहराजवळ असलेले कृषी विद्यापीठ संशोधन व तंत्रज्ञानाचे केंद्र असून शेतकरी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून काम करते. कृषी उत्पादनात गुणवत्ता वाढ, प्रक्रिया उद्योगांना कच्चामाल उपलब्धता,संशोधनावर आधारित नवीन संधी, यामुळे अकोल्यात एक नैसर्गिक औद्योगिक परिसंस्था निर्माण झाली आहे.
भविष्यासाठी नेमकी दिशा
औद्योगिक विकासात केवळ मोठ्या गुंतवणुकीकडे पाहण्याऐवजी, स्थानिक गरजा व पर्यावरणीय परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. अकोल्यासाठी कृषी-आधारित उद्योगांना अधिक चालना, लघु व मध्यम उद्योगांचे आधुनिकीकरण, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा वापर व स्थानिक रोजगार आणि कौशल्य विकास हे धोरणात्मक मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात
अकोल्यात आतापर्यंत जपलेला विकासाचा मार्ग हा संतुलित आणि शाश्वत आहे. मोठे उद्योग हे आर्थिक वाढीचे साधन असले तरी, त्याचा पर्यावरण आणि सामाजिक जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे. अकोल्याचा अनुभव सांगतो की लघु व मध्यम, निसर्गपूरक उद्योगांच्या आधारावर देखील मजबूत औद्योगिक अर्थव्यवस्था उभी राहू शकते.
उद्योजक, नागरिक आणि शेतकरी या तिन्ही भूमिकांतून पाहता, अकोल्याचा औद्योगिक विकास हा केवळ उत्पादनाचा विषय नसून तो जीवनमान, पर्यावरण व सामाजिक संतुलन यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक धोरण ‘मोठ्या उद्योगांपेक्षा शाश्वत आणि विचारपूर्वक उद्योग’ या तत्त्वावर आधारित असणे आवश्यक असल्याचा निष्कर्षाप्रत पोहोचते आहे.


नितीन युगलकिशोर बियाणी
उद्योग मित्र, अकोला

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!