अकोला दिव्य न्यूज : विधानसभेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल नार्वेकर यांचा रायगडमधील एक व्हिडीओ शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे. विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला. तुम्ही सांगताय की मी सांगू?, असे प्रश्न राऊत यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत विचारले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडीओ अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावचा असल्याचं समजतं. या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर आणि त्यांचे काही सहकारी दिसत आहे. त्यांचा गावातील काहींशी वाद सुरु असल्याचं दिसतं. शेत जमिनीच्या मोजणीवरुन हा वाद झाल्याचं बोललं जात आहे. ग्रामस्थ संतापताच नार्वेकर आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी तिथून काढता पाय घेतला.
म्हात्रोळी गावात जमिनीची मोजणी केली जात होती. त्याला जमीन मालकांनी जोरदार आक्षेप घेतला. नार्वेकरांसोबत असलेल्या लोकांनी जमीन मालकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण जमीन मालकांनी त्यांना तिथून अक्षरश: पिटाळून लावलं. गावातील महिलेनं रुद्रावतार धारण केला. जा तू इथून. निघ लवकर. तुला त्या दिवशीच सांगितलं होतं ना, आतमध्ये शिरायचं नाही म्हणून. आम्ही घरात नाही ते बघून, संधी साधून आतमध्ये शिरलात काय तुम्ही, असं म्हणत महिला त्यांच्या मागेच लागली. तिचा आक्रमक पवित्रा पाहता नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथून पळ काढला.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन गटांमधील वाद स्पष्ट दिसत आहे. आत शिरु नकोस, असं तुला सांगितलं होतं ना? आमच्या घरी साखरपुडा होता. तेव्हाही आणि आताही आम्ही घरात नसताना तू आलासच का? आम्ही घरात नसताना आतमध्ये शिरता का तुम्ही? आमची एवढी जागा गेली तरी.. फॉरेस्टमधील जागा किती काढली तुम्ही, अशा शब्दांत जमीन मालक नार्वेकर यांना प्रश्न विचारत आहे. यावेळी नार्वेकरांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो फोल ठरला. त्यानंतर नार्वेकर तिथून निघून गेले.
