अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशभरात थंडी वाढल्यानंतर अंडी, चिकण, मटण आणि माशांच्या मागणीत वाढ होते. सध्या देशात मागणी अधिक आणि त्या समोर १० ते १५ टक्के पुरवठा कमी असल्याने अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत.अकोलासह देशभरात अनेक ठिकाणी कोंबडीच्या अंड्यांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. कोलकात्यापाठोपाठ आता पुण्यात देशात सर्वात जास्त दराने अंड्यांची विक्री होत आहे. अंड्यांच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. हे वाढलेले दर पुढील काही दिवस कायम राहतील, असे अंडी विक्रेता सांगत आहेत.
कोलकात्याच्या घाऊक बाजारात ६.५० रुपये प्रति नग या दराने अंड्यांची विक्री होत आहे. तर पुण्यात घाऊक बाजारात अंड्यांचा दर ६.४४ रुपये प्रति नग इतका आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात अंडी ७ ते ८ रुपये दराने विकली जात आहेत. कोलकाता आणि पुण्यापाठोपाठ अहमदाबाद (६.३९ रुपये), सुरत (६.३७ रुपये), वायझॅगच्या (६.२५ रुपये) घाऊक बाजारात अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. २०२३ मध्ये देशभरातील घाऊक बाजारात अंड्यांचा दर हा ६.१० रुपयांपेक्षा कमी होता. परंतु, आता अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतात दर महिन्याला सरासरी ३० कोटी अंडी विकली जातात.अंडी उत्पादनात सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी अंड्यांचे उत्पादन कमी केले आहे. तर काही कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे. त्यामुळेच ही दरवाढ झाली आहे.
देशातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळ व कोंबड्यांच्या खाद्यावरील खर्च वाढल्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. पोल्ट्री व्यवसायात सातत्याने तोटा होत असल्याने आसपासच्या भागात अनेक ठिकाणी पोल्ट्री बंद आहेत.
अंडे हा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेला पदार्थ आहे. चांगल्या आरोग्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने अंडी खातात. अंडी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन आहे आणि आपल्या शरीरासाठी ती निरोगी आहेत. अंडे हा निश्चितपणे एक पौष्टिक पदार्थ आहे. त्याचे आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अंडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते.