अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुकीत मतदारांनी काठावरच देखील बहुमत दिले नाही. अकोला शहरात भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे महापालिका निवडणुकीत दिसून आले आहे. केंद्रातील व राज्यातील तसेच अकोला शहरातील भाजपच्या कारभाराविरोधात विरोधकांची एकजूट निर्माण झाली. भाजपविरोधात वाढलेल्या जनाधारामुळे भाजपच्या तब्बल १० जागा कमी झाल्या. त्यामुळे भाजपला स्वतःच्या पक्षाचं नाव बदलून “शहर सुधार समिती” या नावाखाली सत्ता स्थापन करावी लागली. महापौर व उपमहापौर निवडणुकीला शहर सुधार समितीच्या नावाने सामोरं जावं लागणे हा, भाजपचा स्पष्ट व नैतिक पराभव आहे.अशी बोचरी टिका मनपातील वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी केली.

अकोला महापालिका व शहरातील कारभार संविधानानुसार आणि लोकशाही मुल्यांवरच चालावा यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. कोणतेही असंवैधानिक, अन्यायकारक किंवा लोकविरोधी कामकाज झाल्यास त्याविरोधात सभागृहात तसेच सभागृहाबाहेर तीव्र संघर्ष केला जाईल. जनतेचे हक्क, संविधानाचे रक्षण आणि पारदर्शक प्रशासनासाठी वंचित बहुजन आघाडी अखंडपणे लढत राहील.असे देव यांनी सांगितले.
