अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पश्चिम विदर्भातील जेष्ठ कॉंग्रेस व सहकार नेते हिदायतउल्ला पटेल यांच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा अध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा आणि माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचे पुत्र प्रा. संजय बोडखे या दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी फेटाळून लावला आहे.

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ०५/२०२६, कलम १०३(१)१०९.३(५) मधील संशयित आरोपी मोहम्मद बद्रुजमा (५३) आणि अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे या दोन्हीजणांनी हिदायत पटेल यांच्या खुन प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज नामंजूर केला आहे.
वा प्रकरणात मृतक हिदायत खां पटेल यांचा पुतण्या व फिर्यादी फजल अली खान रफतउल्ला खान पटेल (रा.मोहाळा) यांनी ६ आरोपी विरुध्द फिर्याद दिली की, दुपारच्या सुमारास इश्ताक पटेल व जावेद पटेल यांनी आवाज दिला की लवकर पळत ये, तेव्हा पळत गेलो असता हिदायतउल्ला पटेल रक्तबंबाळ अवस्थेत दिसले.त्यांच्या जवळ जाऊन विचारले की कोणी मारले. तेव्हा पटेल राजीक उर्फ कालू पटेल याने मारलं असं म्हटलं. पटेल यांच्या मानेवर, छातीवर आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार करून कालू पटेलने जीवघेणा हल्ला केला.
हिदायत पटेल यांना तातडीने अकोट येथील लोखंडे हॉस्पीटल मध्ये दाखल केले असताना हिदायतउल्ला पटेल यांनी सांगितले की, कालू पटेल म्हणाला की, तुम्हाला जीवे मारण्यासाठी मला मोहम्मद बद्रुजमा, राजू विठ्लराव बोचे आणि संजय बोडखे यांनी सांगितले. दरम्यान लोखंडे हॉस्पीटमध्ये प्रथमोपचार करून त्यांना ताबडतोब अकोला येथे ओझोन हॉस्पीटल येथे उपचाराकरिता भरती केले. उपचार सुरू असताना हिदायत पटेल यांचे निधन झाले.

मृत्यूपुर्वी हिदायत पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे या हत्याकांडमध्ये मोहम्मद बद्रुजमा, राजु बोचे, संजय बोडखे, फाजील आसीफ खाँ, फारुख आसीफ खाँ पटेल यांचा सहभाग असावा असा संशय आहे. अशी तक्रार दाखल केली होती म्हणून सदर गुन्ह्यात १०३(१) गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.
या प्रकरणात वरील दोन्ही आरोपीनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर सरकारी जिल्हा सरकारी वकील बी.आर. उपाख्य गिरीश देशपांडे यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना युक्तीवाद केला की, सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी फरार आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी उमेद खान पटेल यांनी दिलेल्या जबानीत दिलेल्या माहितीनुसार तपास करणे आवश्यक आहे. तसेच गुन्ह्यातील अन्य संशयीत आरोपी सुध्दा शहरातुन फरार आहेत त्यांचा शोध घेवुन अटक करणे बाकी असल्याने संशयीत दोन्ही अर्जदारांना विचारपुस करन तपास करने बाकी आहे.
या प्रकरणाचा तपास पुर्ण झालेला नाही. तसेच सदर गुन्ह्यातील संशयीत दोन्ही अर्जदार आरोपी व दुसरे संशयीत आरोपी मुख्य आरोपीला कुठे भेटले व कशाप्रकारे कट रचला याचा घटनाक्रम जुळवून घेणे आवश्यक आहे. आरोपीला जामीन मिळाल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दाबाव आणले जाईल. तपास कामात अडथळा आणु शकतात. तसेच संशयीत अर्जदार आरोपीस जमानत दिल्यास मोहळा व अकोट शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो.मृतक व फिर्यादीच्या नातेवाईकांमध्ये दोन्ही आरोपींविरुध्द रोष आहे त्यातुन आणखी यासारखे गंभीर गुन्हा होण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे वरील सर्व मुद्दे लक्षात घेता, आरोपींचा जमीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील आर.आर देशपांडे यांनी केला.
आरोपीतर्फे अँड.एस.एस. जोशी आणि अँड. गांधी यांनी युक्तीवाद केला.
