अकोला दिव्य न्यूज : देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या जवानांचा गौरव करत महार रेजिमेंटचे जवान विशाल तायडे, जे सध्या सिक्कीममधील चीन सीमेवर -२७ अंश सेल्सिअस तापमानात कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. बिर्ला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व शाळेच्या प्राचार्या मनिषा राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, देशभक्ती गीत, सामूहिक गीत तसेच सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या भावनेने भारलेला होता.

शैक्षणिक वर्षभर विविध उपक्रमांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.प्राचार्या मनिषा राजपूत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी शिस्त व नियम आवश्यक असून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. म्हणूनच भारतासाठी सशक्त राज्यघटना तयार करण्यात आली असून ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली.
अध्यक्षीय भाषणात प्रदीपसिंह राजपूत यांनी संविधानाचा योग्य वापर करणे ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने आचरणात आणले पाहिजे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. उपस्थितांनी कार्यक्रम व शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
