अकोला दिव्य न्यूज : नुकत्याच झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत ३८ जागांवर विजय मिळविलेल्या अकोला भाजपाने ४१ या काठावरच्या बहुमतापेक्षा अधिक ३ सदस्य जास्त घेऊन, अकोला शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्ता स्थापनेचा डाव जिंकला. विशेष म्हणजे या संघर्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम साथ, युतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक नगर सेवक आणि विरोधात निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका विरक आणि एक अपक्ष अशी सहाजणांची मोट बांधून भाजपने अमरावती विभागीय आयुक्तांकडे शहर सुधार आघाडी अकोलाच्या स्थापना आणि अकोला महानगरपालिका भारतीय जनता पार्टी, नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अकोला, महानगरविकास समिती, नॅशनलीस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी आणि अकोला महानगरपालिका शिवसेना यांच्या विलिनीकरणास मान्यता द्यावी, असा अर्ज शहर सुधार आघाडीचे पक्ष नेते व गट नेता पवन महल्ले यांनी सादर केला आहे.

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ५ नुसार अर्ज दाखल केला आहे. या अधिनियमांतर्गत मुळ पक्ष भारतीय जनता पार्टीचे ३८ मनपा सदस्य, नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) ३ सदस्य, महानगरविकास समितीचे १ सदस्य, नॅशनलीस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीचे १ सदस्य, शिवसेनेचे १ सदस्य याप्रमाणे गटाची स्थापना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अन्वये करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ५ नुसार भारतीय जनता पार्टी महानगरपालिका अकोला, नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महानगरपालिका अकोला, महानगरविकास समिती महानगरपालिका अकोला, नॅशनलीस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी महानगरपालिका अकोला, शिवसेना महानगरपालिका अकोला या आघाड्यांचे विलिनीकरण करण्यात येऊन एकमेव शहर सुधार आघाडी, अकोलाची स्थापना दि.२० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली आहे.
ही स्थापना लोकशाही पध्दतीने करण्यात आली आहे. या करिता महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ५ नुसार भारतीय जनता पार्टी महानगरपालिका अकोला, नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) महानगरपालिका अकोला, महानगरविकास समिती महानगरपालिका अकोला, नॅशनलीस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टी महानगरपालिका अकोला, शिवसेना महानगरपालिका अकोलाचे विलिनीकरणास मान्यता देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
