अकोला दिव्य न्यूज : मुंबईच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता या पदासाठीच्या मतदानाची प्रक्रिया येत्या ३१ जानेवारी रोजी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अजूनही भाजप आणि शिंदेसेनेच्या गटाची नोंदणी कोकण आयुक्तालयाकडे झालेली नसल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होईल.

पालिका निवडणुकीनंतर येत्या २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या महापौर निवडीसाठी जाहिरातही देण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, रात्री उशिरा हा कार्यक्रम पुढे ढकलत, त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
महापालिकेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या २४, मनसे ६ आणि एमआयएमचे ८ नगरसेवक यांची कोकण भवनमध्ये नोंदणी झाल्यानंतर त्यांनी आपली हजेरी महापालिका सचिव कार्यालयात लावली तसेच प्रमाणपत्राच्या पावत्याही जमा केल्या आहे. उद्धवसेनेच्या ६५ नगरसेवकांची नोंदणी झाली आहे. परंतु, त्यांनी प्रमाणपत्राची पावती महापालिका सचिव कार्यालयात जमा केलेली नाही. पण, भाजप व शिंदेसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी व्हायची असून, त्यांची ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे कळते.
एकत्रित गट नोंदणी?
भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीबाबत किंबहुना एकत्रित गट स्थापनेच्या संदर्भात अजूनही काही स्पष्ट झालेले नाही. महापौर आमच्या पक्षाचा असेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे तर शिंदेसेनेने महापौरपद किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. मात्र, हे दोन्हीही दावे भाजपला अमान्य आहेत. साहजिकच या दोन्ही पक्षांतील वाद मिटून त्यांची एकत्रित नोंदणी झाल्यानंतरच महापौर निवडीच्या प्रक्रियेला चालना मिळेल, असे दिसते.
