अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: अकोला महापालिका निवडणुकीत २० प्रभागातील अ,ब,क आणि ड या ४ वर्गात ‘या पैकी कोणीही नाही, अर्थात नोटा या पर्यायाला तब्बल २४ हजार ५४५ एवढी मतें मिळाली आहे. नोटाला झालेल्या मतदानाने विजयाच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या भाजपच्या एका उमेदवाराला विजयी ‘मुस्कान’ पासून वंचित राहावे लागले. नोटाला मिळालेल्या मतांची एकत्र गोळाबेरीज आणि विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांची सरासरी केली तर तब्बल ५ नोटा उमेदवार विजयी झाले आहे.

तब्बल ९ वर्षांनंतर नुकत्याच पार पडलेल्या अकोला महापालिका निवडणुकीत मतदारांमध्ये निरूत्साह दिसून येत होता. वर्ष २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या टक्केवारी पेक्षा जवळपास यावेळेस ७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. मतदानाच्या दिवशी मतदारांचा मुड वेगळा होता आणि मतमोजणीनंतर आलेल्या निकालाने मतदारांनी कोणालाही सत्ता स्थापन करणे सहजशक्य ठेवले नाही. दरम्यान नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांचे विश्लेषण केले तर एका प्रभागातील अ,ब,क आणि ड या चारही श्रेणीतील प्रत्येक श्रेणीत सरासरी मतदारांनी २७० मते नोटाला दिली गेली आहेत.
प्रत्येक प्रभागात झालेल्या मतदानाची सरासरी आणि विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात नोटास तब्बल अर्धा टक्का मतं मिळाले आहे. मतदानाचा जवळपास ७ टक्के कमी झालेला टक्का आणि नोटाचा अर्धा टक्का लक्षात घेता यंदा मतदारांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
नोटाला मिळालेल्या मतांमुळे काही उमेदवारांच्या मताधिक्यावर अल्पसा परिणाम झाला. मात्र गत निवडणुकीतही अल्प मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या मुस्कान पंजवाणी यांना यंदा नोटाने विजयाचा उंबरठा ओलांडू दिला नाही. मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेल्या प्रभाग १६ (ब) मधून मुस्कान पंजवाणी भाजपकडून रिंगणात होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून अमरीन सदफ तर शिवसेनेतर्फे सिंधी समाजाच्या वैजयंती मुलचंदाणी रिंगणात होत्या.

पहिल्या पायरीवर पंजवाणी यांची मुख्य लढत वैजयंती मुलचंदाणी यांच्याशी होती आणि काट्याच्या लढतीत पंजवाणी यांना ५ हजार ६३६ तर मुलचंदाणी यांना ३ हजार ७२३ मते मिळाली. मुलचंदाणी तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अमरीन सदफ यांना ६ हजार ९८ मते मिळाली. पंजवाणी पेक्षा अमरीन सदफ यांना फक्त ३६२ मतांचं अधिक्य होते तर नोटाला ७१३ मतें मिळाली होती.नोटाला झालेल्या मतदानाचा सरळसरळ मुस्कान पंजवाणी यांना फटका बसल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे मनपाच्या २० प्रभागापैकी केवळ याच प्रभागात ‘ब’ मध्येच नोटाला सर्वात जास्त ७१३ मते मिळाली. या खालोखाल प्रभाग १३ (ब) मध्ये नोटाला ५९५ मते तर नोटाला सर्वात कमी १०३ मते देखील १३ (ड) मध्ये मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे १३ (ड) मधून आशिष पवित्रकार विजय झाले आहेत.
