अकोला दिव्य न्युज ब्युरो : ससून रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्या प्रकरणी भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला देखील मारहाण केली होती.
पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीया करीता विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल (५ जानेवारी) करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे, आमदार रवींद्र धंगेकर, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांच्यासह आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.
अन् कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते. कार्यक्रम झाल्यावर सुनील कांबळे हे व्यासपीठावरून खाली येत होते. त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याची घटना घडली. त्यावेळी नेमकं काय घडलं हे कोणास समजलं नाही.
त्यानंतर सुनील कांबळे यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे नाराजी देखील व्यक्त केली. तसेच हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी देखील सुनील कांबळे यांचा तेथील एका अन्य कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याची घटना घडली होती.