अकोला दिव्य न्युज ब्युरो : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता असलेल्या एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एल्विश यादव अडचणीत आला आहे. नोएडा पोलिसांकडून रेव्ह पार्टीसंदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक एफआयआर दाखल करण्यात आली असून त्यात एल्विश यादवचंही नाव समोर आलं आहे.
एल्विशवर सापांच्या तस्करी आणि रेव्ह पार्टी आयोजित करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नोएडातील सेक्टर ४९ येथे केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केली होती. या ठिकाणी पाच कोब्रा आणि अन्य जातीचे नऊ साप आढळून आले. या छापेमारीत सापांचे विषही पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करुन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पीपल फॉर एनिमलचे अधिकारी गौरव गुप्ता यांच्या तक्रारीवरुन छापा टाकत ही कारवाई आली.
युट्यूबर एल्विश यादव नोएडा-एनसीआर येथील फार्म हाऊसमध्ये काही लोकांबरोबर मिळून जिवंत सापांचे व्हिडिओही शूट करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच एल्विश अवैधरित्या रेव्ह पार्टीही आयोजित करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात एल्विश यादवच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत पाच कोब्रा, एक अजगर, दोन दुतोंडी साप, आणि एक अन्य जातीचा साप आढळला. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून एल्विश यादवसह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.