Thursday, February 5, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात VAPICON 2026 ! देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच 'ज्ञानमंथन' ; विदर्भ चॅप्टरचं आयोजन

अकोल्यात VAPICON 2026 ! देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच ‘ज्ञानमंथन’ ; विदर्भ चॅप्टरचं आयोजन

अकोला दिव्य न्यूज : वैद्यकीय क्षेत्रात मुंबई नंतर अकोला शहराने नावलौकिक मिळविला असून, दहा सुपर स्पेशालिटी आजाराचे उच्च स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांसोबत या क्षेत्रातील आजारांवर संशोधन करणारे संशोधक व लेखकासोबत देशभरातील ७५ उच्च विद्या विभुषीत डॉक्टरांच्या ज्ञानमंथनाचा वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी VAPICON-2026 आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती एका वार्ताहर बैठकीत असोशिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (API) विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. जयराज संतोषदादा कोरपे यांनी दिली.

अकोला शहरात १२ वर्षांनंतर VAPICON-2026 अर्थात तीन दिवसीय १६ व्या वार्षिक वैद्यकीय परिषदेचे आयोजन अकोला शहरात शुक्रवार ९ ते रविवार, ११ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. देशभरातील नामवंत फिजिशियन्स, संशोधक व वैद्यकीय तज्ञ या परिषदेसाठी अकोल्यात एकत्र येणार आहेत. यामुळे विदर्भातील वैद्यकीय व्यावसायिकांना या तज्ज्ञांसोबत चर्चा , प्रश्नोत्तरे करून ज्ञानार्जन करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र विशेषतः विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रासाठी ही परिषद मैलाचा दगड ठरणार आहे.असे डॉ.कोरपे यांनी सांगितले.

VAPICON-2026 अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यशाळेचे आयोजन दि.९ जानेवारी २०२६ रोजी आयकॉन हॉस्पीटल येथे केले आहे. अकोला शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रो. डॉ. संजय सोनुने, अधिक्षक डॉ. शिरसाम व वैद्यकिय विभाग प्रमुख प्रो. डॉ. मुकूंद अष्टपुत्रे यावेळी प्रामुख्याने उपस्थितीत राहणार आहेत.

या परिषदेचे औपचारिक उद्घाटन शनिवार १० जानेवारी रोजी हॉटेल ग्रँड जलसा येथे असोशिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. डॉ. जोतिरमय पाल (कोलकत्ता) व माजी अध्यक्ष प्रो. डॉ. मिलींद नाडकर (मुंबई), व भावी अध्यक्ष डॉ.जी. नरसीमुलु (हैद्राबाद) यांचे शुभहस्ते होणार आहे. या वैद्यकिय परिषदेस संपूर्ण भारतातुन ७५ उच्चशिक्षीत स्पेशालिस्ट व सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर याठिकणी विविध कार्यशाळा, परिसंवाद (Symposiums) आणि मुख्य भाषण होणार आहे. त्यानंतर १० व ११ जानेवारी अशा या दोन दिवसात व्याख्याने, प्रतिष्ठित ओरेशन, चर्चासत्रे, पोस्टर सादरीकरण, फ्री पेपर्स तसेच क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.या परिषदेत आधुनिक वैद्यकातील नवे संशोधन, उपचार पध्दती आणि तंत्रज्ञान यावर सखोल चर्चा होणार आहे.

श्री राजराजेश्वर मंदिर, नरनाळा किल्ला, शेगांव श्री. गजानन महाराज मंदिर ही प्रमुख आकर्षणे परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. या परिषदेसाठी एपीआय विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे, आयोजक अध्यक्ष डॉ. प्रशांत पोफाळकर, आयोजक सचिव डॉ. रवींद्र सिंगी तसेच डॉ. जयंत वाघेला, डॉ. दिपक मोरे, डॉ.एस.एम.अग्रवाल, डॉ. प्रशांत अग्रवाल, डॉ. समिर मालविया व एपीआयचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. विदर्भातील सर्व डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच आय.एम.ए.च्या सर्व डॉक्टरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वार्ताहर बैठकीत डॉ.प्रशांत पोफाळकर, डॉ.जयंत वाघेला, सचिव डॉ. रवींद्र सिंगची व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!