अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रचं नव्हे तर देशभरातील बांधकाम व्यवसायात अंदुरा गावाचे नावलौकिक करणारे अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती,समाजसेवी,विट उद्योजक व स्वामी ब्रीक्सचे संचालक देवराव कापडे यांचे आज शुक्रवार ५ जानेवारीला सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते. त्यांचा पश्चात पत्नी, मुलगा किशोर, मुलगी, जावई, सून आणि नातनातवंडासह मोठे आप्तकुटुंब आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील वीटभट्टी उद्योगावर शोककळा पसरली आहे. कुंभार समाजासाठी भूषण असलेले दादाराव कापडे यांनी लहान स्वरूपात वीटभट्टीने वीट निर्मितीच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि अंदुऱ्याच्या मातीचे गुणवैशिष्ट्ये जाणून वीटभट्टीत तयार होणाऱ्या वीटेला व वीटभट्टी व्यवसायाला वेगळीच प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वामी ब्रीक्स नावाने प्रतिष्ठान सुरु करुन, आधुनिक व्यवसायाचा दर्जा मिळवून दिला.
सुदृढ व मध्यमबांधा असलेली ही मुर्ती खरोखर संतपुरुषच होती. चेह-यावर सदैव स्मितहास्य, लाघवी स्वभाव व प्रतिष्ठेचा लवलेशही नसलेले निर्मोही देवराव कापडे यांची साधी राहणी आणि उच्च विचारांसह ध्येयाने भारुन केलेल्या अतोनात परिश्रमाने ‘अंदुऱ्याची वीट’ आणि कापडे हे नाव युवापिढीला प्रेरणास्थान झाले आहेत. स्नेही व मित्र परिवार त्यांना कापडे साहेब या नावाने हाक देत. अनेकदा आलेल्या संकटांवर अत्यंत संयमाने मात करणारे कापडे यांच्या संवेदनशील मनाने कुंभार समाजासह इतर समाजाच्या गरजूंना मदत केली आहे. धार्मिक कार्यात, विशेषतः गोरक्षण कार्यात शेवटच्या श्वासापर्यंत अग्रेसर व कार्यरत होते. अजात शत्रू , सर्वांचे आवडते, गरिबांचे कैवारी व अकोला शहरासह पंचक्रोशीचे अर्थाने भूषण असलेले देवराव कापडे यांच्या पार्थिवावर अंदुरा गावात उद्या शनिवार ६ जानेवारीला दुपारी ११ वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.