अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास काही तास राहिले असतांनाच, विधानसभा निवडणुकीमध्ये बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढणारे हरीश आलिमचंदानी यांना महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून प्रभाग १५ (अ ) मधून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आत आपल्या समर्थकांसह दुपारी ३ वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी जबाबदार ठरवून हरीश आलिमचंदाणी यांना भाजपमधून निलंबीत करण्यात आले होते. दरम्यान भाजपमध्ये परतीसाठी हरीश आलिमचंदानी यांचे प्रयत्न सुरू केले. मात्र, पराभवाची सल मनात कायम असल्याने स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्या घरवापसीला विरोध होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराज गटाची मोट बांधण्याचा प्रयत्न हरीश आलिमचंदानी यांनी केला. या नाराज गटाने घेतलेल्या पहिल्याच संवाद सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. या संभाव्य तिसऱ्या आघाडीमुळे फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेसाठी हरीश आलिमचंदानी यांना नागपूरला बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून घरवापसी करण्याचे सूचित केले. स्थानिक नेतृत्वाशी देखील चर्चा करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजूत काढली. त्यानंतर काल सोमवार २९ डिसेंबरला हरीश आलिमचंदानी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात पुनर्प्रवेश केल्याने अनेकांना पोटशूळ उठले. तर उमेदवारी मिळणार नाही,असा सूर लावला जात असताना आज मंगळवार ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तास राहिले असतांनाच, पक्षाने त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली.
