अकोला दिव्य न्यूज : महापालिका निवडणुकीत राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष सोबत लढणार असून जागा वाटपावर देखील एकमत झाल्याचे समजते. या संदर्भात रविवारी दुपारी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रित आली. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते नव्या मित्राच्या शोधात होते. महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे सत्र सुरू झाले. याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना चर्चेचे अधिकार देण्यात आले. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व इतर नेत्यांकडून आघाडी संदर्भात बोलणी झाली. मुंबई महापालिकेतील काही जागांवरून काँग्रेस व वंचितच्या आघाडीचे घोडे अडले होते. मात्र, आता यातून मार्ग काढण्यात आला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांचे नेते रविवारी दुपारी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची ही युती मुंबई महापालिकेसाठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व वंचित आघाडीने एकत्रित येण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाने हातमिळवणी केली आहे. त्याचा मोठा प्रभाव मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतर महापालिकेत आघाडीचे काय?
काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यावर निर्णय झाला असला तरी इतर महापालिका संदर्भात दोन्ही पक्षाने एकत्रित येण्यावर चित्र स्पष्ट झालेले नाही. संबंधित महापालिका क्षेत्रातील स्थानिक स्तरावर आघाडीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती आहे. राज्यात इतरही काही ठिकाणी काँग्रेस व वंचित आघाडी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय समीकरण बदलण्यात या आघाडीचा मोठा प्रभाव राहू शकतो. मुंबई महापालिकेत काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये वंचितच्या वाट्याला ६२ जागा येणार असल्याचे समजते.
