अकोला दिव्य न्यूज : आयुष अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेले हजारो विद्यार्थी नर्सिंग अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक असतांनाही प्रवेशाची अंतिम मुदत संपल्याने प्रवेशापासुन वंचित झाले होते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रायव्हेट नर्सिंग स्कुल अॅन्ड कॉलेज मॅनेजमेंट असोशिएशनचे अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.सुधीर ढोणे यांनी राजकीय व कायदेशीर पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे अखेर इंडियन नर्सिंग कॉंन्सील नवी दिल्ली यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नर्सिंग क्षेत्रातील एएनएम, जीएनएम, बीएससी (नर्सिंग), पी.बी.बीएससी (नर्सिंग) या अभ्यासक्रमास प्रवेश इच्छुक राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

आयुष म्हणजेच आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २० डिसेंबर पर्यंत सुरू होती. या अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नर्सिंगच्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेत असतात. परंतु नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबर रोजी संपल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित झाले होते. प्रायव्हेट नर्सिंग स्कुल अॅन्ड कॉलेज मॅनेजमेंट असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सचिव शंकरराव अडसुळ, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे, डॉ. तस्लीम शेख, कायदेविषयक सल्लागार अॅड. चंद्रकांत जाधव यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अप्पर मुख्य सचिव धिरज कुमार व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांना भेटुन नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्यासाठी इंडियन नर्सिंग कौन्सील यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची विनंती केली. या अधिकाऱ्यांनी तसे पत्रही पाठविले. परंतु १५ दिवसांचा कालावधी नंतरही इंडियन नर्सिंग कौन्सील यांनी प्रवेशाची अंतिम मुदत वाढविली नाही.
त्यामुळे डॉ. सुधीर ढोणे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांची भेट घेऊन इंडियन नर्सिंग कॉंन्सील, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा, राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नावाने पत्र घेऊन प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी केली. जनमताचा रेटा असल्याची वस्तुस्थिती इंडियन नर्सिंग कॉंन्सीलच्या निदर्शनास आणुन दिली.
त्यानंतर डॉ. सुधीर ढोणे यांनी प्रायव्हेट नर्सिंग स्कुल अॅन्ड कॉलेज मॅनेजमेंट असोशिएशन तर्फे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्याची विनंती केली. २४ डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने इंडियन नर्सिंग कौन्सीलला प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्याविषयी जनतेची व संबंधीत राज्यांची मागणी असतांनाही यावर कृती का करत नाही अशी विचारणा केली. यावर इंडियन नर्सिंग कौन्सीलने सकारात्मक निर्णय लवकरच घेण्याची हमी दिली व त्याच दिवशी रात्री प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्याचे पत्र जारी केले. त्यामुळे राज्यात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नर्सिंग असोशिएशनतर्फे अॅड. अमोल कारंडे, अॅड.माणिक डोगरा, अॅड. संचित सिंग, अॅड. सार्थक गुप्ता, अॅड.उत्कर्ष कोकचा व अॅड. ध्रुव पांडे यांनी बाजु मांडली.
