अकोला दिव्य न्यूज : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आज शनिवार २७ डिसेंबरपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनाचा प्रारंभ होत असून चर्चासत्राच्या माध्यमातून तज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे हस्ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून कुलगुरू डॉ. शरद गडाख अध्यक्षस्थानी राहतील.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहील. यंदा भव्य प्रमाणामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे नियोजन कुलगुरू डॉ. गडाख यांचे मार्गदर्शनात करण्यात आलेआहे.
५५० हून अधिक दालन उभारण्यात आले आहेत. यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, राज्य शासनाचा कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज, नैसर्गिक शेती अभियानासह विविध राष्ट्रीय तथा राज्य पातळीवरील शेती आणि ग्रामविकासाशी संबंधित संस्था, विदर्भातील स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून निर्मित कृषी पूरक उत्पादने व खाद्यपदार्थांसह इतरही दालनांचा समावेश आहे.
पुष्प व शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित पशू प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरेल. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदरवाडे यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे (नागपूर), राजेंद्र घोरपडे (अमरावती) तथा विदर्भातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, विद्यापीठ स्तरीय संशोधक, विभाग प्रमुख आणि इतर अधिकारी, कर्मचारी प्रदर्शनासाठी परिश्रम घेत आहेत.
