Friday, December 26, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील लेखिका संमेलन स्मरणात राहणारं - प्रा.डॉ. सुदामे : विदर्भ साहित्य संघाचे...

अकोल्यातील लेखिका संमेलन स्मरणात राहणारं – प्रा.डॉ. सुदामे : विदर्भ साहित्य संघाचे संमेलन उत्साहात

अकोला दिव्य न्यूज : सकारात्मकता, उत्तम नियोजन, नावीन्यपूर्ण साहित्यविषयक कार्यक्रम आणि उत्साहाने भरलेलं लेखिका संमेलन निश्चितच यशस्वी व स्मरणात राहणारं आहे”, असे विचार ज्येष्ठ लेखिका व संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भारती सुदामे यांनी व्यक्त केले. त्या विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाच्या वतीने आयोजित एक दिवसीय लेखिका संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर लेखिका संमेलनाच्या उद्घाटक सुप्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका डॉ. श्वेता पेंडसे, शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर, स्वागताध्यक्ष नीलिमा पाटील, विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, सदस्य नितीन सहस्त्रबुद्धे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. दादा गोरे व अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर, डॉ. सहदेव रोठे, लेखिका संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.


आपल्या भाषणात डॉ. भारती सुदामे पुढे म्हणाल्या की, आतून व्यक्त होणं हे स्त्रीचं सामर्थ्य आहे, लेखनाचा धर्म हा प्रवास व प्रवाह असून केवळ स्वतःपुरतं न बघता समाजासाठी उत्तरदायी असणं, लहान सहान गोष्टींमध्ये समाज आणि राष्ट्र याचं भान असणं आवश्यक असेल तर आपल्या लेखनात निर्मितीत सुद्धा लेखन भाग आणि साहित्यिक जाणीवा जागृत असणं गरजेचं आहे.

प्रभात परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. साहेबराव नारे स्मृति साहित्य मंचावर संपन्न होणारे लेखिका संमेलन हे त्यांच्या संकल्पनेतील उत्तम नियोजनाला पूर्णत्वास नेणारे असून ज्येष्ठ लेखक डॉ. दादा गोरे यांनी लेखिका संमेलनाच्या नावीन्यपूर्ण आयोजनाचे कौतुक केले. संमेलनाच्या उद्घाटक डॉ. श्वेता पेंडसे यांनी “विदर्भ साहित्य संघाचे हे लेखिका संमेलन हे लिहिणार्‍या जुन्या व नव्या पिढीसाठी एनर्जी बुस्टर आहे, योजनाबद्ध आयोजन व व्यवस्थापनाचा हा अविष्कार सर्व संस्थांना दिशादर्शक आहे, असे उद्गार काढले. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, शिक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर यांचे समायोचित भाषणं झाली.

लेखिका संमेलनात दऊत लेखणी या विजय देशमुख संपादित संमेलन विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, बहारार संचालन मंजुश्री कुळकर्णी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पोरे यांनी केले.
दुपारच्या सत्रात अभिनेत्री व लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची मोहिनी मोडक व डॉ. समृद्धी तिडके यांनी प्रकट मुलाखत घेतली.
या संमेलनात प्रकाशक व महिला पत्रकार आणि ज्येष्ठ लेखिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिभाताई जानोळकर, प्रभा नितीन खंडेलवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समारोप समारंभात ज्येष्ठ लेखिकांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखिका पद्माताई मांडवगणे, मीराताई ठाकरे, शीलाताई गहलोत, देवकामाई देशमुख, डॉ. विमल भालेराव, डॉ. लीना आगाशे, वीणा मालशे, प्रेमा शुक्ल, प्रा. डॉ. अनघा सोनखासकर यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नावीन्यपूर्ण उद्घाटन समारंभ
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी या गीतावर प्रभातच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या दिलखेचक नृत्यावर मान्यवरांना व्यासपीठावर बोलावून स्क्रीनवर त्यांचा परिचय हे उपस्थित सुजाण साहित्य रसिकांच्या कौतुकाचा विषय ठरले. ग्रंथदिंडीसह स्व. मिर्झा रफी अहमद बेग ग्रंथदालन व स्व. प्रा. निशाताई बाहेकर कवयित्री कट्टाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

दीपा शर्मांच्या कलेचे कौतुक
महिला कलावंत दीपा शर्मा यांच्या कलादालनाचा गौरव म्हणून लेखिकासंमेलनाच्या व्यासपीठावर त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्तिकीच्या नाट्य छटाने वाहवा मिळविली!
प्रभातची विद्यार्थिनी कु. कार्तिकी मनोज सोनोने यांच्या ‘
माझा डेबू संत झाला रे…’ ही नाट्यछटा व सादरीकरणाने रसिक भारावून गेले.
निमंत्रितांचे कविसंमेलन
प्रा. मीनल येवले यांच्या अध्यक्षतेखाली, विद्याताई बनाफर, शोभना पिंपळकर व कविता राठोड या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत प्रियंका गिरी, मधुराणी बनसोड, वर्षा कावरे, मंदा नांदूरकर, डॉ. मीना सोसे, वर्षा ढोके, अंजली वारकरी, पुष्पा पोरे, विद्या राणे, रेवती पांडे, साधना काळबांडे, अ‍ॅड.रजनी बावस्कर, कीर्तीमाला गोंडचवर, अमिता घाटोळ, नम्रता अडसूळ, सारिका अयाचित, वर्षा दांडगे व निमंत्रित कवयित्रींची आपल्या एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. कवयित्री संमेलनाचे सूत्रसंचालन कल्पना कोलारकर व आभार प्रा. गोपाल नेरकर यांनी मानले.
लेखिका संमेलनात वैशिष्टयपूर्ण उपक्रम
या लेखिका संमेलनात लेखिका व सायबर तज्ज्ञ मोहिनी मोडक यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेली ब्लॉग लेखन कार्यशाळा, शब्दांना पंख देणारा मंच म्हणजे कवयित्री कट्टा आणि लेखिका व अनुवाकि प्रा. डॉ. स्वाती दामोदरे यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन कार्यशाळेला महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला. कवयित्री कट्याचे संयोजन सारिका अयाचित व सहसंयोजन वैशाली पागृत आणि अंकिता कांगटे तसेच काव्य लेखन कार्यशाळेच्या संयोजिका अनुराधा माहोरे यांनी उत्तमरित्या पार पाडले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!