अकोला दिव्य न्यूज : व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल २१ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकालाची तारीख २१ जानेवारी ठेवली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाने सलग चार दिवस युक्तिवाद मांडला. त्यानंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज बुधवार २४ डिसेंबर रोजी विशेष सरकारी वकील अँड.उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाचा अंतिम काऊंटर युक्तिवाद केला.

बचाव पक्षाने धर्मादाय आयुक्त कार्यालयात आरोपींची उपस्थिती बेकायदेशीर नव्हती, असा दावा केला होता. मात्र, या मुद्द्यावर झालेल्या उलटतपासणीत अँड. निकम यांनी आरोपी श्रीराम गावंडे यांना वगळता इतर सर्व आरोपी त्या ठिकाणी कोणत्या कारणाने उपस्थित होते, असा सवाल उपस्थित केला. सर्व आरोपी खून करण्याच्या उद्देशानेच घटनास्थळी जमले होते, असे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, काही साक्षीदार तपासण्यात न आल्याचा आरोप बचाव पक्षाने सरकारवर केला. त्यावर अँड. निकम यांनी स्पष्ट केले की, सूरज दिलीप अंधारे याची साक्ष तपासली असता तो साक्षीदार फितूर झाल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयात तसा अर्ज सादर करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित साक्षीदाराची पुढील साक्ष घेण्यात आली नाही. यापूर्वी अँड. संतोष भोरे हेही फितूर झाल्याचा उल्लेख करण्यात आला. या हत्याकांड प्रकरणात चार आरोपींचा समावेश नसल्याचे समोर आल्याने तसेच त्यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती अँड. निकम यांनी न्यायालयासमोर केली.
