अकोला दिव्य न्यूज : मागील सुमारे साडेचार वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासोबतच पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्य करीत असल्याबद्दल लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा संत नगरी शेगाव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सत्कार करण्यात आला. माजी खासदार तथा महाराष्ट्र सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवीत करण्यात आले.

लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे, सचिव राजेंद्र देशमुख, अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, सचिव मनोहर मोहोड, महाराष्ट्र संघटक जगदीश अग्रवाल यांचा या सत्कारमूर्तींमध्ये समावेश आहे.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सुधीर सावंत म्हणाले की, सैनिक ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर जागरूक राहून देशाचे रक्षण करतो त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला मीडिया ग्रुप व त्यात कार्यरत असलेले पत्रकार सुद्धा समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करून सामाजिक नैतिक मूल्यांचे रक्षण करीत असतात. त्यामुळे पत्रकार जगतातील बंधू-भगिनींचा सुद्धा सत्कार करून त्यांचा सन्मान केलाच पाहिजे.
याप्रसंगी बुलढाणा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष रामराव देशमुख, पंजाबराव देशमुख, सैनिक फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. अर्चना नागरे, महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे सचिव रवींद्र घनबहादुर यांचासह सैन्य दलातील अनेक माजी अधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
