Saturday, December 20, 2025
No menu items!
No menu items!
Homeअखेर पाठीत खंजीर खुपसलाच ! पाठीवर 'हात' ठेवणाऱ्या 'गांधी'नाच सोडला

अखेर पाठीत खंजीर खुपसलाच ! पाठीवर ‘हात’ ठेवणाऱ्या ‘गांधी’नाच सोडला

अकोला दिव्य • गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : कळमनुरीच्या राजीव सातव या उमद्या नेत्याच्या अकाली निधनानंतर काँग्रेसश्रेष्ठी म्हणजे गांधी परिवाराने त्यांच्या परिवाराला आस्थापूर्वक आधार दिला. राजीव यांच्या पत्नीस आधी विधान परिषदेतील एका रिक्त जागेवर नियुक्त केले, नंतर त्यांना ६ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ बहाल केला; पण प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस पक्षाचा ‘हात’ अचानक सोडून दिल्यानंतर राजकारणातील पक्षनिष्ठेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असला तरी, सातव यांनी गांधी कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसलाच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१४ पासून गेल्या ११ वर्षांत अनेकांनी पक्षांतरे केली. त्यात आता प्रज्ञा सातव यांचे नाव विराजमान होणार आहे. मागील काळात काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडून भाजपात आश्रय घेतल्यानंतर गांधी परिवाराला त्याचे कदाचित आश्चर्य वाटले नसेल; पण सातव यांची पक्ष सोडण्याची कृती गांधी कुटुंबाला चकित करणारीच नव्हे, तर धक्का देणारी असल्याचे मत काँग्रेसमधील नेत्यांनी व्यक्त केले.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही आठवड्यांत महाराष्ट्र विधान परिषदेतील १२ जागा रिक्त झाल्या होत्या. त्या भरण्याची प्रक्रिया होत असताना, विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाट्यास केवळ एकच जागा येणार होती. या एका जागेसाठी पक्षामध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. मराठवाड्यातून अनेकांनी पक्षाकडे अर्ज करून संधी देण्याची विनंती केली होती. सारे इच्छूक वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत होते.

नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार हेही एक दावेदार होते. त्यांच्यासाठी एक शिष्टमंडळ थेट दिल्लीमध्ये धडकले. त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली. आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नांदेडच्या उर्वरित काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करून वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्याची किमया केली होती. त्यांंत मुस्लिम समाजाचे योगदान लक्षणीय होते. या पार्श्वभूमीवर सत्तार यांच्यासारख्या सामान्य परिवारातील प्रतिनिधीस संधी द्या, असे तेव्हाच्या सर्व नेत्यांना सांगितले गेले.

राज्याच्या इतर भागांतील इच्छुकांनीही आपली बाजू पक्षनेत्यांकडे मांडली. त्याच काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीमध्ये आले. एका जागेसाठी पक्षाकडे शेकडो अर्ज-विनंत्या-शिफारशी आल्या आहेत, असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. बाळासाहेब थोरात यांनीही नांदेडच्या शिष्टमंडळाला तसेच सांगितले; पण काँग्रेस श्रेष्ठी प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी देतील, याचा अंदाज राज्यातील नेत्यांना आधी आला नव्हता.

वरील जागेसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असताना, प्रज्ञा सातव आपल्या मुलासह दिल्लीमध्ये आल्या होत्या. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. परिषदेवर आपल्याला केवळ दीड वर्षे मिळाल्यामुळे आणखी एक संधी देण्यात यावी, अशी विनंती सोनियांकडे त्यांनी केली. या दरम्यान पक्षाचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष दोघे मिळून दिल्लीमध्येच काही संभाव्य नावे तयार करत होते; पण १०, जनपथमध्ये केवळ एकच नाव ठरले. सोनिया आणि राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या परिवाराला पोरकेपणा जाणवू नये म्हणून प्रज्ञा सातव यांच्या नावावर झटपट शिक्कामोर्तब केले. यानिमित्ताने पक्षाने आपला ‘हात’ त्यांच्या पाठीवर ठेवला; पण प्रज्ञा सातव त्यांची मुदत २०३०पर्यंत असतानाही काँग्रेसचाच नव्हे, तर गांधी परिवाराचाच हात सोडला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!