अकोला दिव्य न्यूज : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात जोपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळत नाही, तोपर्यंत अटकेची टांगती तलवार असेल. दरम्यान माणिकराव कोकाटे यांची प्रकृती खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

ॲड. माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यापासून विविध कारणांमुळे वादात अडकले होते. शेतकरी कर्जमाफीबद्दल त्यांनी केलेले विधान किंवा विधिमंडळात मोबाइलवर गेम खेळण्याचे प्रकरण असो, पक्षाने वेळोवेळी त्यांची बाजू सावरून घेतली होती. मात्र बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत कोकाटे गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले.
सदनिका लाटल्याचे प्रकरण काय आहे?
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. त्यांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विधिमंडळात मोबाइल पाहण्याचे प्रकरण
कृषी मंत्री असताना माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाइलवर गेम खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. यासंबंधी दोन व्हिडीओ रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केले होते. त्यानंतर बराच वाद उफाळला होता. माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले.
शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधान
मध्यंतरी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. “एखादा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण इथे आम्ही फक्त एका रुपयात पीक विमा देतो, तरीही काही लोक त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, असे कोकाटे म्हणाले होते.
मंत्री माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम राहिल्याने आमदारकी व मंत्रिपद धोक्यात आले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी अजित पवार गटातून खान्देशातील आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रीपदावर असताना भाजपावर टीका
भाजपा तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे. भाजपाचे काहीच राहिलेले नाही. इकडून फोड, तिकडून फोड, फोडाफोडीमध्ये त्यांचे आयुष्य चालले. त्यांचे बिचारे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत, अशी टीका कोकाटे यांनी नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान केली होती.
क्रीडामंत्री माणिक कोकाटे हे पुन्हा चर्चेत…
सतत वादात सापडणारे माणिकराव कोकाटे कोण आहेत?
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत.
१९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक जिंकली.
२००४ मध्ये ते दुसऱ्यांदा सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले.
२००९ मध्ये कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्यांदा आमदार झाले.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
२०१९ मध्ये कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली.
एकसंघ राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर कोकाटे यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना महायुती सरकारमध्ये कृषीमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली.”
